महेश चेमटे मुंबई : मुंबई सेंट्रल येथील एसटी कार्यालयात मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याच्या संशयावरून महिला वाहकाचे निलंबन करण्यात आले. निलंबन रद्द करण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांकडे दाद मागितली म्हणून थेट बदली करण्यात आली, असा आरोप एसटी सेवेत कार्यरत एका महिला वाहकाने केला आहे. घरची परिस्थिती हलाखीची असून केवळ संशयावरून थेट निलंबन करण्यात आल्याने, तसेच गेले दोन महिने निलंबन मागे न घेतल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नही उपस्थित झाल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.१३ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी १२.३० ते १ या वेळेत नियमानुसार नियोजित ड्युटी लावावी, या मागणीसाठी महिला वाहक मुंबई सेंट्रल आगारातील वरिष्ठ आगार व्यवस्थापक यांच्याकडे गेली होती. या वेळी महिला वाहक आणि व्यवस्थापक यांच्यात चर्चा सुरू असताना महिला वाहक मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करीत असल्याच्या संशयावरून व्यवस्थापकांनी महिलेचा मोबाइल काढून घेतला. रेकॉर्डिंग सुरू आहे की नाही याची पडताळणी न करता व्यवस्थापकांनी तिला अपमानित केले. या वेळी ‘माझी लेखी माफी माग अन्यथा मी निलंबन करेन,’ असा दम व्यवस्थापकाने दिल्याचा आरोप या महिला वाहकाने केला आहे. मात्र रेकॉर्डिंग करत नसल्याने लेखी माफी मागण्यास महिला वाहकाने नकार दिला. या घटनेनंतर १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजून २० मिनिटांच्या सुमारास महिला वाहकाला निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला.या निलंबनाबाबत महिला वाहकाने महाव्यवस्थापकांना समक्ष भेटून तक्रार दाखल केली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर महाव्यवस्थापकांनी महिला वाहकाचे निलंबन रद्द करण्याची तोंडी सूचना दिली. मात्र, याला दोन महिने उलटूनही अद्याप निलंबन मागे घेण्यात आले नसल्याचे या महिला वाहकाने सांगितले.नियम काय सांगतो?मुळात मुंबई सेंट्रल आगारात महिला वाहक आणि व्यवस्थापक यांच्यात हा वाद झाला होता. यात मुंबई सेंट्रल आगार हे सक्षम प्राधिकारी होऊ शकत नाही. तथापि या प्रकरणात आगार व्यवस्थापक यांनीच सक्षम प्राधिकारी म्हणून जबाबदारी घेतली, हे नियमबाह्य आहे.बघू, मी बोलतो!परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांचीदेखील जानेवारी २०१८मध्ये त्या महिला वाहकाने भेट घेतली. या वेळी मंत्री रावते यांनी एसटी वाहकाकडून घडलेली हकिकत समजून घेतली. याबाबत मंत्री रावते यांनी एसटी महामंडळातील संबंधित अधिकाºयांशी बोलतो असे सांगितले. मात्र, अद्याप निलंबन कायम आहे. याबाबत ‘लोकमत’ने मंत्री रावते यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, साहेब व्यस्त आहेत, नंतर फोन करा, असे सांगण्यात आले.बदली ही नियमानुसारच-निलंबित असलेल्या महिला वाहकाची मुंबई सेंट्रल आगारातून कुर्ला नेहरूनगर आगारात बदली करण्यात आली आहे. ही बदली एकाच महानगरपालिका क्षेत्रात असल्याने ही बदली नियमानुसारच करण्यात आली असल्याचे पत्र महिला वाहकाला विभागीय आस्थापनाआदेश क्रमांक १०० राज्य परिवहनच्या मुंबई विभागाच्या विभाग नियंत्रकाने पाठवले आहे.
महिला वाहकाचा आरोप : व्हिडीओ काढल्याच्या संशयावरून थेट निलंबन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:51 AM