मुंबई : निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचे गांभीर्य रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या लक्षात आणून देण्यासाठी सोमवारी सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी मास बंक केला. याच दिवशी कान-नाक-घसा विभागातील रुग्णाच्या नातेवाइकाने दोन महिला डॉक्टरांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एका महिला रुग्णाची कान-नाक-घसा विभागात शस्त्रक्रिया करायची होती. परंतु शारीरिक स्थिती भूल देण्यासाठी योग्य नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागेल, असे संबंधित डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाइकांना सांगितले. मात्र नातेवाइकांनी डॉक्टरलाच शिवीगाळ केली. दुसऱ्या एका डॉक्टरने या नातेवाइकांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही महिला डॉक्टरना नातेवाइकांनी शिवीगाळ केली. याबाबत संबंधित महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र नंतर घाबरून तक्रार मागे घेतली. पण सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी पुन्हा पोलिसांत तक्रार दाखल केली. डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याने अशा घटना घडल्यास रुग्णालय प्रशासन जातीने तक्रार दाखल करेल, असे डॉ. मर्चंट यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
महिला डॉक्टरला शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2015 3:45 AM