Join us

महिला डॉक्टरला दोन महिने हाउस अरेस्ट, वॉशरूमसाठीही घ्यावी लागे परवानगी; सात कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:34 IST

धक्कादायक म्हणजे, वॉशरूमला जाण्यासाठीही त्यांना ठगांची परवानगी घ्यावी लागत होती...

मुंबई : तुमच्या सिम कार्डचा वापर मनी लॉण्ड्रिंगच्या गुन्ह्यात झाला असून, तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती घातली जाते. त्यानंतर विविध ठिकाणचे पोलिस, कस्टम, ईडी, सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून बँक खात्यातील रक्कम तपासणीच्या नावाखाली ट्रान्सफर करण्यास दबाव आणला जातो. अशा पद्धतीची सायबर भामट्यांची कार्यप्रणाली असते. अशाच ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या डॉक्टर महिलेस दोन महिने हाउस अरेस्टमध्ये ठेवले होते. धक्कादायक म्हणजे, वॉशरूमला जाण्यासाठीही त्यांना ठगांची परवानगी घ्यावी लागत होती.

मध्य मुंबईतील ५७ वर्षीय डॉक्टर महिलेस सात कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. दोन महिने त्यांचा व्हिडीओ कॉल सतत सुरू असायचा. वॉशरूम तसेच किराणा दुकानात जाण्यासाठी त्या ठगांची परवानगी घेऊन घराबाहेर पडत होत्या. तर, दुसऱ्या घटनेत हाउस अरेस्टची भीती घालून बीएआरसीच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या बँक खात्यातील ३२ लाखांच्या जमा पुंजीवर सायबर भामट्यांनी नुकताच डल्ला मारला. 

दरम्यान, वृद्ध नागरिक, उच्च शिक्षित मंडळीदेखील भामट्यांच्या जाळ्यात सहज अडकत आहेत. त्यामुळे अशा वाढत्या घटना चिंताजनक आहेत.

एक कोटी ८० लाख पाठविले अन् फसले- ऑगस्टमधील एका घटनेत मध्य मुंबईतील ७६ वर्षीय नागरिकास टेलिग्रामवर कनेक्ट करून ड्रग्जच्या गुन्ह्यात अटकेची धमकी देण्यात आली. - म्यानमारमध्ये १० ते १२ भारतीय अशाच केसमध्ये फसले असून, एनआयए त्यांना बाहेर काढण्याचे काम करीत असल्याचे सांगून त्यांना जाळ्यात ओढले. - एक गुप्त करार केला असून, अटक होणार नसल्याचे सांगून एक कॉपी टेलिग्रामवर पाठवली. केससाठी काही रक्कम जमा करण्यास सांगून गुन्ह्याचा निकाल लागल्यानंतर पैसे परत करणार असल्याचे भासवून, पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्याकरिता त्यांनी बचत ठेव, खात्यातील असे एकूण एक कोटी ८० लाख रुपये पाठविले.  

टॅग्स :गुन्हेगारीसायबर क्राइमपोलिसधोकेबाजी