मुंबई : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनाबाहेर गुरुवारी संध्याकाळी एका महिलेने गोंधळ घालून तोडफोड केल्यानंतर मंत्रालयातील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हल्लेखोर महिला दादरमधील रहिवासी असून ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
सहाव्या मजल्यावरील फडणवीस यांच्या दालनाबाहेर महिलेने गोंधळ घालत तिथल्या कुंड्या फोडल्या तसेच फडणवीस यांच्या नावाची पाटीही काढून फेकून दिली. ही महिला विना पास मंत्रालयात आल्याचे समजते.
महिला मानसिक रुग्ण
या महिलेचे नाव धनश्री सहस्रबुद्धे असून ती दादरला शिवाजी पार्क परिसरात राहते. तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तिच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली.
तिच्याकडे चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक घरी गेले होते मात्र तिने दरवाजा उघडला नाही. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
या महिलेविरुद्ध यापूर्वीदेखील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रारी तसेच गुन्हे नोंद आहेत. महिला तापट स्वभावाची असल्याने तिचे कुणाशी पटत नाही.
सोसायटीतील रहिवाशांसोबतदेखील वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांकडे दाखल होणाऱ्या तक्रारीवरून समजते. स्वतःला हानी करून घेण्याची धमकी देत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना माघारी परतण्याची वेळ येत असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
त्या महिलेचे काय म्हणणे होते, तिची व्यथा काय होती? हे आम्ही समजून घेऊ. ही बहीण चिडली असेल, तर तिची व्यथा समजून घेऊ. तिला कुणी जाणीवपूर्व पाठवले असेल तर समजून घेऊ. विरोधक हताश व निराश आहेत. म्हणून अशा घटनांवर ते टीका करतात - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकीकडे सरकारचे लाडक्या बहिणीचे इव्हेंट सुरू आहेत तर दुसरीकडे एक महिला मंत्रालयात येऊन संतापाने नावाची पाटी फोडत आहे. ही दोन चित्र खूप काही सांगून जात आहेत - विजय वड्डेटीवार, विरोधी पक्षनेते