"परस्त्री मातेसमान"; आदित्य ठाकरेंनी दिला शिवरायांचा दाखला, मोर्चाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:58 PM2023-08-02T14:58:28+5:302023-08-02T15:00:31+5:30
मुंबई - शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदींच्या भाषणावर टीका करताना, शिवसेनेनं त्यांना खासदार का ...
मुंबई - शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदींच्या भाषणावर टीका करताना, शिवसेनेनं त्यांना खासदार का केलं, याचं कारण सांगितलं. विशेष म्हणजे यावेळी, त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा दाखल देत, हे विधान केलं होतं. आमदार संजय शिरसाटांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी सडक्या विचारांचे लोक म्हणत पलटवार केला होता. तर, स्वत: प्रियंका चतुर्वेदींनीही ट्विट करुन शिरसाटांना सुनावलं आहे. अद्यापही याप्रकरणावरुन वाद सुरूच आहे. आता शिवसेनेच्यावतीने महिलांवरील अन्यायाविरुद्ध मोर्चा काढण्यात येत आहे. त्यास, आदित्य ठाकरेंनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.
ठाणे येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेतील फुटीर गटाला गद्दार म्हटलं होतं. त्यावरुन, शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वैदींवर निशाणा साधला. त्यांचं सौंदर्य पाहून त्यांना खासदार केल्याचं शिरसाट यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात, महिला पत्रकाराकडून आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, ''गद्दार आमदारांना त्यांची किंमत कळली आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? हा प्रश्न पडतो. याचं दु:ख देखील होतं. पण, जनता त्यांना जागा दाखवेल.'', असे उत्तर आदित्य यांनी दिले होते. आता, पुन्हा एकदा आदित्य यांनी ट्विट करुन महिलांवरील अन्यायाविरुद्ध युवतीसेना, शिवसेना मोर्चा काढत असून त्यास आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं.
स्त्रियांचा सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. पण सध्या ह्याचा विसर अनेकांना पडला आहे. भारतभरात स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि हिंसक घटना दररोज वाढत आहेत. महाराष्ट्रात तर सत्तेत बसलेल्यांकडूनच स्त्रियांबद्दल वारंवार बेताल विधानं होत आहेत. 'परस्त्री मातेसमान' असे…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 2, 2023
स्त्रियांचा सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. पण सध्या ह्याचा विसर अनेकांना पडला आहे. भारतभरात स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि हिंसक घटना दररोज वाढत आहेत. महाराष्ट्रात तर सत्तेत बसलेल्यांकडूनच स्त्रियांबद्दल वारंवार बेताल विधानं होत आहेत. 'परस्त्री मातेसमान' असे छत्रपती शिवरायांचे संस्कार असलेल्या महाराष्ट्रात आज 'देखणेपणा' अधोरेखित करत गलिच्छ बडबड केली जातेय. अश्यावेळी ठामपणे सांगायची गरज आहे, "नारी का अपमान, अब नहीं सहेगा हिंदुस्थान!", असे आदित्य यांनी टविट करुन म्हटलंय. तसेच, युवासेना युवती आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या ह्या मूक मोर्चाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे, सुजाण नागरिक म्हणून तुम्हीही पाठिंबा द्याल अशी आशा आहे, असे म्हणत आदित्य यांनी सर्वांनीच या मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी मागणीही केलीय.