मारहाण झाल्याचा कुटुंबाचा आराेप; नैसर्गिक मृत्यू झाल्याचा कारागृह प्रशासनाचा दावा
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा कारागृहात चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिला कैदी रेखा वाणी (वय ४६) यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. पोलीस कोठडीत शॉक देऊन मारहाण केल्यामुळे तिची प्रकृती खालावली. त्यात, तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. याबाबत गृहमंत्री, मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यांच्यासह नागपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दिली.
पुण्यातील चारवाडा भागात राहणाऱ्या रेखा यांचा मुलगा अक्षय याने दिलेल्या माहितीनुसार, २७ जानेवारीला दुकानातील चोरीप्रकरणी कुरार पोलिसांनी आई रेखाला अटक केली. कुरार पोलिसांच्या चौकशीनंतर नवघर, खालापूर पोलिसांकडे तिचा ताबा देण्यात आला. आईसह घरातील आणखी पाचजणांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीदरम्यान तिला बेदम मारहाण करण्यात आली. शिवाय तिला शॉकही देण्यात आला. खालापूर पोलिसांच्या चौकशीनंतर २२ फेब्रुवारी रोजी तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
न्यायालयीन कोठडीत १ मार्च रोजी ती चक्कर येऊन कोसळली. तेव्हा तेथील जेलरने तिला रुग्णालयात न नेता तेथेच बाजूला बसविले, अशी माहिती आईसोबत अटकेत असलेल्या अन्य नातेवाइकांकडून मिळाली; तर, २ मार्च रोजी सकाळी तब्येत बिघडल्याने आईला जे. जे. रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कारागृहातून मिळाली. त्यानंतर दोन तासांनी तिचा मृत्यू झाल्याचा कॉल आला, असे अक्षय यांचे म्हणणे आहे. पोलीस कोठडीदरम्यान झालेल्या मारहाणीत आईचा मृत्यू झाल्याचा संशयही त्यांनी वर्तवला. या प्रकरणाची सखोल चौकशी करत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी वाणी कुटुंबीयांनी केली.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस, आयुक्त तसेच नागपाडा पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल, जे. जे. रुग्णालयात दाखल केल्यापासूनची कागदपत्रे, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी काय उपचार केले याचे अहवाल सादर करावेत, व्हिसेरा नमुने जतन करावेत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, भायखळा कारागृहातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला असून, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे सांगितले आहे. तसेच याबाबत अधिक चौकशी करीत असल्याचेही स्पष्ट केले.
* सहा दिवसांनी स्वीकारला मृतदेह
मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा वाणी कुटुंबाने घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर सहा दिवसांनी म्हणजे ८ मार्च रोजी त्यांनी मृतदेह स्वीकारला.