मुंबई : रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांबाबत गेल्या काही महिन्यांत अनेक गैरवर्तवणुकीच्या घटना घडल्या असून, त्याची दखल घेत आता महिला प्रवाशांसाठी महिला रिक्षाचालक आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधेसाठी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडून (एमएमआरटीए) मंजुरीही देण्यात आली आहे. महिला चालकांचा ड्रेसकोड ठरवण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना आरटीओला देण्यात आल्या आहेत. प्रथम ठाण्यात आणि त्यानंतर मुंबईत हा प्रयोग करण्यात येईल, असे आरटीओतील सूत्रांनी सांगितले.सध्या भारतातील रांची, इंदौर, ग्वाल्हेर या शहरात महिला रिक्षाचालक असलेली सेवा सुरू झाली आहे आणि त्यासाठी चालकांना ड्रेसकोड देण्यात आला असून, खास महिलांसाठी असलेल्या रिक्षांना रंगही देण्यात देण्यात आला आहे. अशाच प्रकारची सेवा एमएमआरटीए (मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई, विरार, मीरा-भार्इंदर, भिवंडी, उल्हासनगर) क्षेत्रांत सुरू करण्यासाठी एमएमआरटीए प्रयत्नशील आहे. महिला रिक्षाचालकांसाठी गुलाबी किंवा नारंगी रंगाचा ड्रेस आणि रिक्षांचा रंग हा गुलाबी, पिवळा किंवा नारंगी यापैकी असेल, असे सांगण्यात आले. यावर शासनाकडून निर्णय झाल्यानंतर त्यावर त्वरित अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.
ठाणे, मुंबईत महिला रिक्षाचालक
By admin | Published: July 22, 2015 1:37 AM