बारमध्ये महिला कामगार ‘डान्सर’
By Admin | Published: April 19, 2016 04:02 AM2016-04-19T04:02:43+5:302016-04-19T04:02:43+5:30
उत्पादन शुल्क विभागाकडून बारसाठी दिल्या जाणाऱ्या नोकरनाम्यात धोरणात्मक बदलाची गरज निर्माण झाली आहे. एका बारसाठी किमान आवश्यकपुरुष व महिला
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
उत्पादन शुल्क विभागाकडून बारसाठी दिल्या जाणाऱ्या नोकरनाम्यात धोरणात्मक बदलाची गरज निर्माण झाली आहे. एका बारसाठी किमान आवश्यकपुरुष व महिला कामगारांची खातरजमा न करताच नोकरनामे होत आहेत. यामुळे नोकरनाम्यात समावेश असलेल्या जादा महिलांचा वापर बारमध्ये अनैतिक प्रकारासाठी होत आहे.
बारमालकाकडून सादर केलेल्या नोकरनाम्यावर केवळ शिक्कामोर्तब करण्याचे काम सद्यस्थितीला सुरू आहे. या अनागोंदी कारभाराचा पुरेपूर फायदा बारमालकांकडून घेतला जातोे. बहुतांश बार अपुऱ्या व अडचणीच्या जागेत चालवले जात असून त्याठिकाणी ३० ते ३५ ग्राहक बसतील एवढीच बैठक व्यवस्था आहे. यानुसार प्रत्येक टेबलकरिता एक किंवा दोन याप्रमाणे १० ते १५ कामगारांची त्याठिकाणी आवश्यकता असते. छोट्याशा लेडीज सर्व्हिस बारमध्येही गरजेपेक्षा जादा महिला कामगार असल्याने विनापरवाना डान्सबारमध्ये डान्सर म्हणून किंवा देहविक्रीसाठी त्यांचा वापर होण्याची शक्यता असते. तसे चित्रही पोलिसांच्या यापूर्वीच्या कारवायांमध्ये समोर आलेले आहे. परंतु कारवाईवेळी नोकरनाम्याच्या आधारावर त्यांची सहज सुटका होते. यामुळे बारची पाहणी करून बारसाठी गरजेइतक्याचा कामगारांना मंजुरी मिळणे आवश्यक आहे. याकरिता नोकरनाम्याच्या प्रक्रियेत धोरणात्मक बदलाची गरज निर्माण झाली आहे.
अनेकदा नोकरनाम्यात समावेश असलेल्या महिला कामगारांच्या वयाबाबत देखील साशंकता असते. अल्पयवीन बांगलादेशी मुलींचा बारमध्ये देहविक्रीसाठी वापर होवू शकतो. अल्पवयीन असतानाही त्यांचे वय १९ पेक्षा जास्त भासवले जावू शकते. बहुतांश बार कामगारांची वैद्यकीय चाचणी वाशीतील महापालिका रुग्णालयात केली जाते. प्रतिमहिना सुमारे ८ ते १० बारबालांच्या वयाची वैद्यकीय चाचणी त्याठिकाणी होत असल्यामुळे प्रतिमहिना तेवढ्या महिला बार कामगार म्हणून जोडल्या जात असल्याचे दिसत आहे. परंतु महापालिका रुग्णालयात वयाच्या पुराव्यात फेरफार करणे अवघड असल्यामुळे संबंधितांकडून हद्दीबाहेरील रुग्णालयांचा आधार घेतला जात असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. लेडीज सर्व्हिस बारमध्ये वेटर म्हणून ठरावीक महिलांकडून नोकरनामा करून घेतला जातो. त्यानंतर प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून वेटरचेच काम करून घेतले जाते का? याची चौकशी होत नाही. काही बारमध्ये त्या महिला वेटरकडून अश्लील चाळे करून ग्राहकांना लुभावण्याचे काम केले जाते. तर काही विनापरवाना डान्सबारमध्ये डान्सर म्हणून देखील या महिला वेटर नाचवल्या जात असल्याचे दिसत आहे. परंतु बारवर कारवाईचे अधिकार असलेल्या संबंधित सर्वच विभागाकडून त्याकडे कानाडोळा होत असल्याचा संताप सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.