महिला कार्यकर्त्यांचा राबता वाढला
By admin | Published: February 6, 2017 03:30 AM2017-02-06T03:30:31+5:302017-02-06T03:30:31+5:30
आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घरोघरी प्रचार करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांची मागणी वाढलेली आहे
मुंबई : आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घरोघरी प्रचार करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांची मागणी वाढलेली आहे. मुंबई शहर-उपनगरातील बरेच प्रभाग महिला आरक्षित झाल्याने, निवडणुकीच्या रिंगणातील महिला उमेदवारांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे घरोघरी प्रचार करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांपेक्षा महिला कार्यकर्त्यांचा ‘प्रचारक’ म्हणून भाव वधारल्याचे चित्र आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकांना जाहीर प्रचाराच्या कालावधीत कार्यकर्त्यांची मागणी अधिक असल्याने, अवघ्या काही तासांच्या फेरीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाच्या हाती ३०० ते ३५० रुपये पडत आहेत. तरुण कार्यकर्ते व महिलांचा उमेदवारांना तुटवडा भासल्याने, शेजारील प्रभागातून आयात करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहारासह पिण्याचे पाणी, वाहन व्यवस्था आदींची बडदास्त ठेवण्यात आली. त्यात महिलांचा दिनक्रम व्यस्त असल्याने, त्यांची गर्दी जमविताना पदाधिकाऱ्यांची दमछाक होते आहे.
मुंबईत शिवसेना, मनसे, भाजपा, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उतरल्याने, आधीच कार्यकर्त्यांचे विभाजन झाले आहे. प्रत्येक प्रभागात पाचहून अधिक उमेदवार रिंगणात असल्याने, प्रत्येकाची कार्यकर्ते जमविताना दमछाक होते आहे. दैनंदिन प्रचार, प्रचार पत्रकांचे वितरण, चौक सभा, प्रचार फेरी यासाठी आधीपासून बहुतेकांना दाम मोजून कार्यकर्ते आणावे लागत आहेत. एका प्रभागातील काही कार्यकर्ते व महिला दुसऱ्या प्रभागात गेल्यामुळे आपल्या फेरीत गर्दी जमवायची कशी, हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला. काही तासांच्या फेरीसाठी काहींनी जादा मेहनताना देण्याची तयारी ठेवली आहे. बहुतेक उमेदवारांनी घाऊक पद्धतीने कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यावरही भर दिला आहे. (प्रतिनिधी)