Join us

जेट्टीमुळे माशांची वाहतूक थेट बाजारपेठेत

By admin | Published: November 05, 2014 5:05 AM

सातपाटीच्या किना-यावर उभारलेल्या जेटटीमुळे मासेमारी करून आलेल्या नौकामधील मासे उतरविणे सुलभ झाले

हितेन नाईक, पालघरसातपाटीच्या किना-यावर उभारलेल्या जेटटीमुळे मासेमारी करून आलेल्या नौकामधील मासे उतरविणे सुलभ झाले असून मच्छीमारीच्या साहित्याची चिखल तुडवित कराव्या लागणाऱ्या वाहतुकीचा त्रास आता बंद झाला आहे. जेटटीवरूनच मासे थेट बाजारपेठेपर्यंत पोहचत असल्याने खलाशी कामगारासह नौकामालकांची अंगमेहनत आता संपुष्टात आली आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सातपाटी येथे दांडापाडा ते बामणीपाडा अशी ८०० मीटरची सुमारे ५ कोटीची जेटी, दिड कोटीचे मासळी लिलावगृह, ५० लाखाचे नौका रिपेअरींग यार्ड तर ५० लाखाचे जाळी विणण्याचे शेड असा एकूण आठ कोटीचा निधी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या माध्यमातून सातपाटीला मिळाला आहे. त्यामुळे सातपाटी-मुरबे येथील ३०० ते ४०० मच्छीमारी नौकामालक व खलाशांची अंगमेहनतीची कामे पूर्णत: बंद झाली आहेत. पुर्वी नौका दुरूस्ती पासुन ते नोकावर डिझेल, बर्फ, पाणी इ. साहित्य चढवण्यासाठी ढोपरभर चिखलातून पोहचावे लागत असे. तसेच मासेमारी करून आलेल्या नौकातील मासे बाजारपेठेत पोहचविण्यासाठी खांद्यावर कावड धरावी लागत असे. परंतु थेट एडवण पासून ते झाई बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्यावर अनेक सोयी सुविधा निर्माण झाल्याने मच्छीमार सुखावला आहे. सातपाटीमधील ८०० मी. च्या जेटीचे कामही आता अंतीम टप्प्यात असून जेटीवर उभारलेल्या रस्त्यावरून माशांची टेम्पो व हातगाडी मधून गावाबाहेरून वाहतुक थेट सहकारी संस्था व मार्केटपर्यंत केली जात आहे. तर लिलावगृह बांधण्याच्या जागावर जुनाट मोडकळीस आलेल्या कर्जाऊ नौका पडून असल्याने त्या हटविण्याची कारवाई होत नसल्याने लिलावगृहाचे काम खोळंबले आहे. मत्स्यव्यवसाया खात्यानेही संबंधीत नौकाधारकांना नोटीशी बजावल्या आहेत. वरील मच्छीमारांसाठी सोयीसुविधा मला लवकरात लवकर पूर्ण करावयाच्या असून माझ्या कामाआड येणाऱ्या अडचणी दुर केल्यास मला सर्व कामे त्वरीत पूर्ण करता येतील असे अंकिता इंटरप्रायजेस, डहाणूचे निखील गोहेल यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)