हवा शुद्धीकरणासाठी आता उपकरण बसविण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:23 AM2019-02-26T00:23:44+5:302019-02-26T00:23:46+5:30
महासभेसमोर मागणी : वाढत्या प्रदूषणाची मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा
- शेफाली परब-पंडित
मुंबई : अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच आता शुद्ध हवादेखील मुंबईकरांची मूलभूत गरज बनली आहे. देशाची राजधानी दिल्लीपाठोपाठ मुंबईतील वाढत्या प्रदूषणानेही धोक्याची घंटा वाजविली आहे. त्यामुळे मुंबईतही अन्य राज्यांप्रमाणे हवा शुद्धीकरण उपकरणे बसविण्याची मागणी महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे. मात्र, हा उपाय म्हणजे तात्पुरती मलमपट्टी असून, प्रदूषणरूपी रोगाकडे दुर्लक्षच होत असल्याची नाराजी पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सर्वाधिक प्रदूषित महानगरांमध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. जागतिक दर्जाच्या या शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. मात्र, यासाठी हरित पट्टा नष्ट होत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे मुंबईकर आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत असल्याने, जास्त प्रदूषण असलेल्या भागांत हवा शुद्धीकरण उपकरणे बसविणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे मुंबईतील अशा प्रदूषित भागांचे सर्वेक्षण करून दिल्लीप्रमाणे त्या ठिकाणी हवा शुद्धीकरण उपकरण बसविण्याची ठरावाची सूचना नगरसेविका ज्योत्स्ना मेहता यांनी पालिका महासभेपुढे मांडली आहे.
मात्र, ही कल्पना पर्यावरणतज्ज्ञांना पटलेली नाही. हवा शुद्धीकरण उपकरण लावून प्रदूषणाचे संकट टाळणार नाही. वाहतुकीचे वाढते प्रमाण, डिझेलची वाहन, कचरा जाळणे अशा विविध माध्यमांतून हवा दूषित करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वप्रथम प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्याचबरोबर, सायकल ट्रॅक बसविणे, सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणे, डिझेलच्या वाहनांचे प्रमाण कमी करून इलेक्ट्रिक वाहन आणणे, अशा प्रयोगांची गरज आहे. यासाठी राज्य सरकार व महापालिकेने प्रयत्न करावे, अशी जोरदार मागणी पर्यावरणतज्ज्ञांनी केली आहे.
आरोग्याला धोका
उष्णता आणि धुळीमुळे श्वसनाच्या विकारात गेल्या वर्षभरात वाढ झाली आहे, तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
दिल्लीमध्ये ५० फूट उंचावर ‘सिटी क्लीनर’ नावाने एअर प्युरिफायर बसविण्यात आले आहेत. या उपकरणांची शुद्ध हवा देण्याची क्षमता ९९.९९ टक्के इतकी आहे. या उपकरणाने तीन किलो मीटरपर्यंतच्या परिसरातील ७५ हजार लोकांना शुद्ध हवा मिळते. त्यामुळे मुंबईतही अशी उपकरणे बसवावी. या ठरावाच्या सूचनेमुळे किमान प्रदूषण या विषयावर गांभीर्याने चर्चा होऊन, त्यावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न होतील.
- ज्योत्स्ना मेहता, नगरसेविका
मुंबईत प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. अंधेरी, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे अशा ठिकाणी त्याचे प्रमाण तीनशेपर्यंत पोहोचले आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, शुद्धीकरणासाठी उपकरणे लावून प्रश्न सुटणार नाही. डिझेलच्या वाहनांवर बंदी आणणे, प्रदूषण वाढविणाऱ्या कारखान्यांना काही वेळेसाठी बंद ठेवणे, इलेक्ट्रिक वाहन, सायकल ट्रॅकला प्रोत्साहन देणे, असे दीर्घकालीन उपाययोजना होण्याची गरज आहे.
- भगवान केशभट,
संस्थापक, वातावरण फाउंडेशन
प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा म्हणजे अशी उपकरणे नव्हे. हवा शुद्धीकरणासाठी उपकरणे बसविण्याचा प्रयोग महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने यापूर्वीच केला आहे. अशी काही यंत्रे मुंबईतील प्रदूषित ठिकाणी बसविण्याचा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला खर्च यात योगदान द्यायचे असल्यास, ही उपकरणे बसविणाºया निरी आणि आयआयटी या संस्थेबरोबर संपर्क करून उपक्रम राबवावा.
- संजय शिंगे,
अध्यक्ष, ह्युमॅनिटी फाउंडेशन