खलील गिरकर मुंबई : गेट वे आॅफ इंडिया येथून जलमार्गे सुटणाऱ्या सेवेवरील ताण वाढत चालल्याने जलमार्गे प्रवास करणाºया मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी भाऊच्या धक्क्याजवळील डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल येथून नवीन फेरी सेवा चालवण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात या सेवेला प्रारंभ होईल. त्यामुळे गेट वे आॅफ इंडिया येथून सुटणाºया फेरी सेवेवरील ताण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल येथून १७ जानेवारीला नवीन फेरी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्या सेवेची चाचणी १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. १७ तारखेला केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला केवळ मुंबई-उरणच्या दरम्यान असणाºया कान्होजी आंग्रे बेटापर्यंत सेवा पुरवण्यात येणार आहे. त्यानंतर भविष्यात टप्पाटप्प्याने बेलापूर, जेएनपीटी, करंजा, रेवस, धरमतर आदी ठिकाणी सेवा पुरवण्यात येणार आहे. गुरुवारी प्रारंभ होत असलेल्या या सेवेमध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त लाँच पुरवण्यात येणार आहे. या ठिकाणी लाकडी बोट वापरण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी दोन बोटी उपलब्ध झाल्या होत्या, मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे सध्या केवळ एकाच बोटीवर अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबई पोर्ट ट्र्स्टने जलपर्यटनाच्या माध्यमातून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.