सागर नेवरेकर मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील भवन्स कॉलेज कॅम्पस, भवन्स नेचर अॅण्ड अॅडव्हेंचर सेंटर येथे ‘प्रकृती : भवन्स नेचर फेस्टिव्हल २०१९’ला सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ग्रीन व रेड इग्वाना (दक्षिण अमेरिकेत आढळणारी घोरपड) असणार आहे. हा फेस्टिव्हल २० जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.ग्रीन इग्वाना हा प्राणी दक्षिण अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला या देशात आढळून येतो. इग्वाना हा चार ते पाच फुटांपर्यंत वाढतो. विशेष म्हणजे इग्वाना शुद्ध शाकाहारी असून झाडांची पाने व फुले खातो. भवन्स नेचर अॅडव्हेंचर सेंटरमध्ये ग्रीन, रेड, ग्रीन-रेड रंगाचे असे तीन परदेशी इग्वाना आहेत. भवन्स नेचर अॅडव्हेंचर सेंटरमध्ये सध्या लहान इग्वाना असून मोठा इग्वाना फेस्टिव्हलमध्ये निसर्गप्रेमींना पाहायला मिळणार आहे.इग्वाना हा बिनविषारी प्राणी आहे. इग्वानाची मादी वर्षभरात एका वेळेस ४० ते ५० अंडी देते. अंडी देताना इग्वाना हा वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे करून त्यातील एकाच खड्ड्यामध्ये अंडी देतो.त्यामुळे अंडी खाण्यासाठी येणाऱ्या शत्रूपासून अंड्याचे संरक्षण करण्यासाठी ही शक्कल लढविली जाते. इग्वानाला पाणी असलेल्या ठिकाणी राहायला आवडते. त्यामुळे जेथे पाणी आहे तेथील झाडांवर इग्वाना आढळून येतात. इग्वानाचे वजन ८ ते ९ किलोपर्यंत असते. तसेच स्वत:चे संरक्षण करण्यासाठी शेपटीचा उपयोग करतो, अशी माहिती ‘प्रकृती : भवन्स नेचर फेस्टिव्हल’चे संचालक हिमांशू प्रेम जोशी यांनी दिली.>निसर्गप्रेमी व प्राणीपे्रमींसाठी पर्वणीमहोत्सवामध्ये रॅपलिंग, कमांडो नेट, बर्मा ब्रिज, फ्लायिंग फॉक्स, रॉक क्लायम्बिंग अॅण्ड रॅपलिंग, झिप लाइन, तिरंदाजी, रायफल नेमबाजी आदी गोष्टींचा समावेश जैव विविधतेवर निसर्ग भटकंती, श्वान प्रदर्शन, आॅर्किड व बोन्साय प्रदर्शन, फन सायन्स, नैसर्गिक छायाचित्रे प्रदर्शन, औषधी वनस्पती प्रदर्शन, फुलपाखरे विभाग, वन्यप्राणी निगा विभाग, आध्यात्मिक होमीओपॅथी आरोग्य निगा, पर्यावरणस्नेही उत्पादने, जैव विविधता आदी गोष्टी निसर्गप्रेमी व प्राणीप्रेमींना अनुभवायला मिळणार आहेत.
ग्रीन इग्वाना ठरणार फेस्टिव्हलचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 3:29 AM