सह्याद्रीवर छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांची पर्वणी, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 08:42 PM2024-02-23T20:42:17+5:302024-02-23T20:43:18+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० व्या वर्षानिमित्ताने उत्साहात ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत.
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सह्याद्री वाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. आज (२४ फेब्रुवारी) दुपारी दीड वाजता प्रसारीत होणाऱ्या लेखक-दिग्दर्शक दिगपाल लांजेकर दिग्दर्शित `फत्तेशिकस्त' चित्रपटाने या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० व्या वर्षानिमित्ताने उत्साहात ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण व प्रेरणा नव्या पिढीला मिळत आहे. शिवरायांची प्रेरणा प्रेक्षकांना मिळावी, यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित निवडक प्रेरणादायक चित्रपट दाखविण्यात येतील. हे सर्व चित्रपट सर्वांना पाहण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.