मुंबई : पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई शॉपिंग महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईबरोबरच महाराष्ट्राच्या पर्यटनाला आणि येथील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. फेस्टिव्हलमध्ये २०० नामवंत कंपन्या सहभागी होणार असून विविध प्रकारचे ५०० कार्यक्रम या फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या फेस्टिव्हलचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील जिओ गार्डन येथे शुक्रवारी या महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटन सोहळ्याला पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार प्रसाद लाड, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे उपस्थित होते. दुबईच्या धर्तीवर आयोजित केलेल्या फेस्टिव्हलचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काम पाहणार आहेत. हा महोत्सव १२ ते ३१ जानेवारीदरम्यान चालणार आहे.फेस्टिव्हल दरम्यान या सर्व घटकांकडून विविध सेवांवर ४० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलती देण्याची तयारी या घटकांनी दर्शवली आहे. तसेच याच कालावधीत मुंबईतील सर्व हॉटेलांतील पदार्थांचे दरही सारखे राहावेत यासाठी हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेबरोबर चर्चा सुरू असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. या फेस्टिव्हलमध्ये प्रामुख्याने कपडे, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, खाद्य महोत्सवांची रेलचेल राहणार आहे. या वेळी एमटीडीसीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.मुंबईचा ब्रॅँड प्रस्थापित होईलमुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचे आकर्षण जगभरात आहे. या शहराकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आयोजित केलेला हा महोत्सव निश्चित उपयुक्त ठरेल. या महोत्सवातून मुंबईचा एक ब्रँड प्रस्थापित होईल. दरवर्षी किमान एक महिना हा महोत्सव घेण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.पर्यटनमंत्री रावल या वेळी म्हणाले की, मुंबईत रिक्षापासून विमानापर्यंत तर वडापावपासून पंचतारांकित हॉटेलापर्यंतच्या सेवासुविधा उपलब्ध आहेत. शॉपिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, फूड स्टॉल अशा विविध माध्यमातून शॉपिंग महोत्सव हा सांस्कृतिक महोत्सवही होणार आहे. यापुढील काळात शॉपिंग फेस्टिव्हल लोकोत्सव आणि महामहोत्सव बनविण्यात येईल.- जयकुमार रावल, पर्यटनमंत्री
फेस्टिव्हलमुळे पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:13 AM