Join us

येऊरचा बछडा लवकरच मारणार चिकन सूपवर ताव; वजन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 1:51 AM

येऊरच्या जंगलात आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याचे पालनपोषण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान करत आहे.

सागर नेवरेकर मुंबई : येऊरच्या जंगलात आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याचे पालनपोषण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान करत आहे. उद्यानाच्या अनुभवी पथकाच्या देखरेखीखाली या बछड्याची वाढ होत आहे. आता बछड्याचे वजन २ किलोपर्यंत वाढले असून तो वेगवेगळ्या शारीरिक हालचाली करू लागला आहे. तसेच त्याला लवकरच चिकन सूपही खायला दिले जाणार असल्याचे उद्यान प्रशासनाने सांगितले.सध्या बछड्याच्या आहारात वाढ केली जात आहे. एक ते दोन दिवसात त्याला चिकन सूप खाण्यासाठी दिले जाणार आहे. औषधोपचारही सुरू आहेत. बछड्याच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे़ तो खेळण्यांसोबत खेळत आहे. दुडूदुडू धावूही लागला आहे. आतापर्यंतचा हा सहावा बछडा उद्यानात दाखल झाला आहे़ तो इतर बछड्यांपेक्षा वेगळा आहे. आईशिवाय त्याला कसे वाढवायचे हे मोठे आव्हान आमच्या समोर होते. परंतु उद्यानातील पथकाने ते यशस्वीरीत्या पेलले असे म्हणायला वावगे ठरणार नाही. बछड्याची देखभाल दिवभरामध्ये तीन पाळ्यांमध्ये नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते. यात एक हँडलर व पाच सहायक यांचा सहभाग आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.बछड्याचे वजन दोन किलोपर्यंत वाढले आहे. अजूनही तो बंगला क्रमांक आठमध्ये राहत आहे. शारीरिक व्यायामासाठी त्याला दिवसातून दोन ते तीन वेळा बाहेरील वातावरणामध्ये सोडले जाते. आता तो चांगला तंदुरुस्त आहे. आता त्याला चिकन सूप सुरू करणार असून त्यानंतर बॉईल चिकन ही दिले जाणार आहे. बछड्याची काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय डॉ. मनीष पिंगळे, मुकेश मोरे, राजा भोईर, वैभव पाटील, संजय बरफ, प्रशांत टोकरे, मयूर झिरवे, संदीप गायकवाड, दिनेश गुप्ता आणि पंकज मोहणे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती व्याघ्र व सिंह विहाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी (अधीक्षक) विजय बारब्दे यांनी दिली.