Join us  

ताप, डोकेदुखी, अंगदुखी; ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे नाहीत ना? जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:12 AM

पाकिस्तान व स्वीडनमध्ये ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘मंकीपॉक्स’च्या आजाराची खूप चर्चा आहे. मुंबईत अद्याप त्याचे रुग्ण आढळलेले नसले तरी या आजाराबाबत सतर्क राहण्याचे निर्देश केंद्र, राज्य सरकार आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. 

पाकिस्तान व स्वीडनमध्ये ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतात केंद्र सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने १८ ऑगस्टला रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यात ‘मंकीपॉक्स’ संसर्गास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून सेव्हन हिल्स रुग्णालयात १४ रुग्णशय्या (बेड) असलेला कक्ष आरक्षित ठेवला आहे. 

कशामुळे होतो ‘मंकीपॉक्स’चा संसर्ग?

मंकीपॉक्स संसर्ग हा ऑर्थोपॉक्स या डीएनएच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे दोन्ही प्राणी विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत.

मंकीपॉक्सचा प्रसार-

थेट शारीरिक संपर्क, शरीरद्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्रव, अप्रत्यक्ष संपर्क, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत. तसेच जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला, तर श्वसनमार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे, बाधित प्राणी चावल्यामुळे या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

मंकीपॉक्ससदृश इतर आजार-

१) कांजण्या

२) नागीण

३) गोवर 

४) सिफिलीस 

५) हात 

६) पाय

७) मौखिक आजार

विलगीकरण कधी कराल? 

१) मंकीपॉक्सबाधित रुग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी स्वतंत्र वायुविजन व्यवस्था असावी. रुग्णाने तीन स्तर आधारित मास्क घालणे गरजेचे आहे.

२) रुग्णाने पुरळ, फोड नीट झाकले जावेत, यासाठी लांब बाह्यांचे शर्ट आणि पायघोळ पँट वापराव्यात. लक्षणांनुसार उपचार घ्यावेत आणि शरीरात पुरेशा प्रमाणात पाण्याचे प्रमाण कायम राहील, याची दक्षता घ्यावी.

विमानतळावर तपासणी सुरू-

‘मंकीपॉक्स’संदर्भात नुकतीच विमानतळ आरोग्य अधिकारी, इमिग्रेशन अधिकारी, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांची एकत्रित समन्वय बैठक झाली. विमानतळ आरोग्य अधिकारी विभागामार्फत ‘मंकीपॉक्स’ बाधित आफ्रिकन देशातून येणारे नागरिक तसेच इतर प्रवाशांची तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात येत आहे.

रुग्णांचा संसर्गजन्य कालावधी-

अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांच्या खपल्या पडेपर्यंत किंवा पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.

काय आहेत लक्षणे? 

ताप, लसिका ग्रंथी सूज, डोकेदुखी, अंगदुखी-थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला, कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या समुदायांमध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

टॅग्स :मुंबईआरोग्यहेल्थ टिप्स