बाजारपेठांमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’चा फिव्हर
By Admin | Published: February 14, 2016 03:01 AM2016-02-14T03:01:39+5:302016-02-14T03:01:39+5:30
प्रेमाचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातील पहिल्याच आठवड्यापासून तरुणाईला व्हॅलेंटाइन डेचे वेध लागतात. एका दिवसात प्रेम व्यक्त करणारे यंगस्टर्स आता आठवडाभर
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
प्रेमाचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातील पहिल्याच आठवड्यापासून तरुणाईला व्हॅलेंटाइन डेचे वेध लागतात. एका दिवसात प्रेम व्यक्त करणारे यंगस्टर्स आता आठवडाभर व्हॅलेंटाइन वीक साजरा करतात. कॉलेजीयन्स अगदी आतुरतेने वाट पाहात असलेल्या या व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात झाली असून, गुलाबी रंगाने शहरातील दुकाने सजली आहेत.
गुलाबाचे फुल आणि ग्रीटिंग हे भेटवस्तूंचे प्रकार आता जुने झाले असून, तांत्रिक युगात जगणाऱ्या या तरुण पिढीला काही तरी हटके गिफ्टिंगचे प्रकार आवडत असल्याने यंदा दुकानातही विविध प्रकारच्या गिफ्ट्स पाहायला मिळत आहेत. यामध्ये हार्ट शेप वाइंड बेल, कपल्स किचेन, मुलांसाठी हातात घालण्याचे लव्ह बँड्स, मुलींसाठी हार्ट शेप ज्वेलरी नव्याने आलेल्या पाहायला मिळत असून, म्युझिकल गिफ्ट्सची तरुणांना भुरळ पडत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
म्युझिकल गिफ्टमध्ये स्वत:च्या आवाजात संदेश रेकॉर्ड प्रियजनांपर्यंत पोहोचविण्याचा चांगला पर्याय असल्याने याकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. हार्ट शेपमधील कुशन्सचे विविध प्रकार बाजारात पाहायला मिळत असून, ३०० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत या कुशन्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
इकोफे्रंडली वस्तूंची मागणी लक्षात घेता, कागदापासून तयार केलेल्या गुलाबाच्या फुलांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असून, एका गुलाबाची किंमत १२० ते १५० रुपये इतकी आहे. प्रिय व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचविण्याचे काम करणाऱ्या भेटकार्डांमध्येही आता नव्याने आलेल्या डिजिटल भेटकार्डांना वाढती मागणी असून, यामध्ये विविध आकारांची ८० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंतची आकर्षक भेटकार्डे उपलब्ध आहेत. व्हॅलेंडाइन वीकमध्ये सेलीब्रेट केला जाणारा चॉकलेट डे, टेडी डेकरिता हार्ट शेप चॉकलेट, रंगबेरंगी टेडी बेअर्सच्या खरेदीकरिता ग्राहकांची झुंबड उडाली आहे. मुलींना भेटवस्तू देण्याकरिता दुकानांमध्ये विविध नावीन्यपूर्ण एक्सेसरीज उपलब्ध असून डायमंड, कुंदन लावलेल्या ज्वेलरीला अधिक मागणी आहे.
व्हॅलेंटाइनकरिता आॅनलाइन बाजारातही विविध वस्तू उपलब्ध असून, प्रियजनांना भेटवस्तू देण्याकरिता प्रिंटेड मग, जोडीदारासोबत फोटो असलेला टी-शर्ट्स तसेच गॅजेट्सला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत असून, आॅनलाइन मार्केटही तेजीत सुरू आहे. आठवडाभरापासून तरुण-तरुणींची व्ही-डेकरिता खेरदी सुरू असून, तरुणांबरोबरच ज्येष्ठांचाही या सेलीब्रेशनमध्ये सहभाग वाढत असून, सर्वच वयोगटातील नागरिकांनी खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे वाशी येथील विक्रेता सुनील शर्मा यांनी सांगितले. शॉपिंग मॉल्स, ब्युटीपार्लसमध्येही स्पेशल व्ही-डे आॅफर्स पाहायला मिळत आहेत.