प्रीपेड रिक्षाचा पहिल्याच दिवशी फियास्को
By admin | Published: May 1, 2015 10:27 PM2015-05-01T22:27:20+5:302015-05-01T22:27:20+5:30
रिक्षांच्या रांगेतून सुटका व्हावी, भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना अद्दल घडावी, ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, जेवढा प्रवास केला तेवढेच भाडे प्रवाशांनी द्यावे,
ठाणे : रिक्षांच्या रांगेतून सुटका व्हावी, भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना अद्दल घडावी, ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, जेवढा प्रवास केला तेवढेच भाडे प्रवाशांनी द्यावे, या हेतूने ठाण्यात मोठा गाजावाजा करून प्रीपेड रिक्षा संकल्पनेचा नारळ महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर फोडला खरा. परंतु, पहिल्याच दिवशी या संकल्पनेला रिक्षाचालकांनीच हरताळ फासल्याचे दिसले. याचबरोबर सॉफ्टवेअरमध्येदेखील अनेक त्रुटी आढळल्याने आणि मीटरपेक्षा २० टक्के अधिक भाडे द्यावे लागत असल्याने प्रवाशांनीदेखील याकडे पाठ फिरवली.
मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही प्रीपेड रिक्षांची संकल्पना काही महिन्यांपूर्वी पुढे आली होती. त्यानंतर, यासाठी ठाण्यातील विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी युनियनने पुढाकार घेत ही संकल्पना हाती घेतली. आरटीओने यासाठी सॉफ्टवेअर तयार केले. त्यानुसार, यामध्ये प्रत्येक २ किमीच्या अंतराचा समावेश आहे. त्यामुळे २, ४, ६, ८ किमीचेच बिल या सॉफ्टवेअरमधून निघत आहे. परंतु, एखाद्याला मध्येच उतरायचे असेल तर त्या ठिकाणचे बिल यातून निघत नसल्याने पैसे किती आकारायचे, हा घोळ पहिल्याच दिवशी दिसून आला. दुसरीकडे रिक्षाचालकांनीदेखील याकडे पाठ फिरविल्याचे दिसले. प्रीपेडप्रमाणे भाडे द्यायचे असल्याने रिक्षांना लावलेल्या मीटरचे काय करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळेच ठाणे स्टेशन परिसरात ज्या संघटनेने यासाठी पुढाकार घेतला, तिने इतर रिक्षाचालकांना या योजनेत सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात अर्ध्याहून अधिक वेळ गेला. परंतु, काही रिक्षाचालकांनीच याला प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)