ऐकावं ते नवलच! पद वाचवण्यासाठी तिनं उभी केली काल्पनिक सवत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 05:40 AM2019-07-01T05:40:57+5:302019-07-01T09:04:32+5:30
कोर्टाने ठोठावला 1 लाख दंड
मुंबई: दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याने अपात्र ठरून आपले पद जाऊ नये यासाठी जालना जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याने काल्पनिक सवत उभी करून आपला मुलगा प्रत्यक्षात तिचा असल्याची लबाडी केल्याचे उघड झाल्यानंतर उच्च न्यायालयाने या महिलेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कायद्यानुसार १३ सप्टेंबर २००० नंतर दोनहून अधिक अपत्ये होणाऱ्या व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात. सुरेखा मुकुंद दाभाडे यांना अनिकेत हा चौथा मुलगा झाल्याच्या कारणावरून अपात्र घोषित केले गेले होते. मात्र त्यातून वाचण्यासाठी त्यांनी असा बनाव रचला की अनिकेत हा आपल्या पतीला त्यांच्या दीपाली या दुस-या बायकोपासून झालेला मुलगा आहे. अनिकेत दीड वर्षाचा असताना दीपाली घरातून निघून गेली व तिचा अद्याप पत्ता लागलेला नाही.
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश न्या. रवींद्र घुगे यांनाहे सर्व प्रकरण संशयास्पद वाटले. आपला बनाव न्यायाधीशांच्या गळी उतर नाही हे पाहिल्यावर सुरेखा यांनी याचिका मागे घेऊ देण्याची विनंती केली. मात्र न्या. घुगे यांनी त्यास ठाम नकार देत उलट सुरेखा व त्यांच्या पतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याचे संकेत दिले. मात्र दाभाडे दाम्पत्याने लबाडी कबूल करून्न गयावाया केल्यावर गुन्हा नोंदविता एक लाख दंडाचा आदेश दिला गेला. दंडापैकी प्रत्येकी ५० हजार रुपये औरंगाबाद यथील कर्करोग रुग्णालयास व घाटी रुग्णालयास गरीब रुग्णांच्या उपचारांसाठी द्यायचे आहेत. या दाम्पत्यास अशी अपात्रता लागू असणारी निवडणूक आयुष्यात पुन्हा लढविता येणार नाही, असेही न्यायालयाने जाहीर केले.
गेल्या वर्षभरात न्या. घुगे यांच्यापुढे अशाच प्रकारच्या लबाडीची अनेक प्रकरणे आली. व्यक्तिगत राजकीय फायद्यासाठी अर्धन्यायिक प्राधिकाऱ्यांची व खुद्द उच्च न्यायालयाचीही फसवणूक करण्याचा हा रोग बोकाळत चाचला आहेव त्यास कठोरपणे आळा घालण्याची गरज आहे, असे नमूद करून न्यायमूर्तींनी अशा प्रत्येक प्रकरणात अद्दल घडेल असे आदेश दिले.
इतरही काही प्रकरणे
- सुभाष हणमंतराव मोरे या नांदेड जिल्हयातील ग्रामपंचायत सदस्याने तर वैष्णवी ही तिसरी मुलगी आपली नव्हे तर आपल्या वडिलांची मुलगी म्हणजेच आपली बहीण आहे, असा बनाव केला होता. पण वैष्णवी जन्मली तेव्हा सुभाष यांचे वडील ६५ वर्षांचे व आई ६० वर्षांची होती. त्यांनाही निवडणूक बंदी केली.
- अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील कोलगावच्या सदस्या संगीता खंडागळे यांनी तर आपले तिसरे अपत्य ठरलेल्या मुदतीच्या आधी जन्मल्याचे दाखविण्यासाठी हॉस्पिटलमधून खोटा जन्मदाखला व शाळेतून बनावट दाखला घेतला होता.
- जालना जिल्ह्यातील बिलाल इसाक शेख यांनी आपले तिसरे अपत्य भावाचे असल्याचे कुभांडे रचले होते. त्यांना २.५ लाखांचा दंड ठोठावला गेला.