Join us

फडणवीस महिलांवर फिदा; अर्थसंकल्पाचं कौतुक करताना माजी मंत्र्यांचे अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 3:20 PM

सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उद्घाटन भाजप देशमुख यांच्या हस्ते झाले.

मुंबई/सोलापूर - राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात महिला वर्गाला खुश करण्यात आलंय. महिला वर्गासाठी अनेक सुविधा यंदाच्या अर्थसंकल्पात देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, एसटी बस सेवेत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत सुरूही करण्यात आली आहे. तर, स्त्री जन्माचे स्वागत म्हणून मुलींच्या पालकांना काही रक्कमही देऊ केली आहे. याच अनुषंगाने भाषण करताना राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी फडणवीसांच्या निर्णयाचं कौतुक करताना अजबच विधान केलंय.  

सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उदघाटन भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना भाजप आमदारांनी आश्चर्यकारक विधान केले आहे. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना महिलांचा मोठ्या प्रमाणात विचार केला आहे. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंतची काळजी घेतली. देवेंद्र फडणवीस महिलांवर फिदा झाले आहेत, असे सुभाष देशमुख यांनी म्हटलंय. देशमुख यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे. मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले. मुलगी शिकायला गेल्यावर त्यालासुद्धा पैसे द्यायचं ठरवलं. परत पाचवी सहावीला गेल्यावर 5 ते 6 हजार रुपये तिच्या खात्यात जमा होतील. दहावीचे शिक्षण झाल्यावर मुलगीच्या १८ वर्षानंतर तिला १५ किंवा १८ हजार रुपये मिळतील. मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. 

महिलांच्या बचत गटासाठी देखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केलं, महिलांच्या बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहे, अशी माहिती सुभाष देशमुख यांनी दिली. मात्र, यावेळी, फडणवीस हे महिलांवर फिदा झाले आहेत, असे अजब-गजब विधान त्यांनी केले. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

टॅग्स :महिलादेवेंद्र फडणवीससुभाष देशमुखअर्थसंकल्प 2023