शिवसेनेच्या आमदाराला टक्कर देण्यासाठी भाजपतून माजी आमदाराची फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 06:11 AM2019-08-19T06:11:29+5:302019-08-19T06:11:39+5:30
२००९ साली ते याच विभागातून निवडून आले होते, त्यावेळी राजहंस सिंग यांनी सुनील प्रभूंचा ५ हजार ८६५ मतांनी पराभव करत विजय मिळविला होता.
- योगेश जंगम
मुंबई : दिंडोशी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार सुनील प्रभू यांच्या मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी भाजपचे मुंबई उपाध्यक्ष राजहंस सिंग यांनी केली आहे. २००९ साली ते याच विभागातून निवडून आले होते, त्यावेळी राजहंस सिंग यांनी सुनील प्रभूंचा ५ हजार ८६५ मतांनी पराभव करत विजय मिळविला होता. २०१४ साली येथूनच प्रभू यांनी निवडणूक लढवून सिंग यांचा तब्बल २० हजार ४०८ मतांनी पराभव करत जुना हिशोब चुकता केला होता. या दोन्ही वेळी वेगवेगळी परिस्थिती होती. यंदाही या दोघांमधील संघर्ष पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राजहंस सिंग यांनी या मतदार संघातून तयारी सुरू केली आहे. या विभागातून काँग्रेसमधून आठ जण, राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन, मनसेमधून दोन जण, तर शिवसेनेतूनही एक जण इच्छुक आहे.
सत्तर टक्के हिंदू मतदार असलेल्या दिंडोशी विधानसभा क्षेत्रामध्ये सातपैकी चार नगरसेवक शिवसेनेचे आहेत, तर दोन नगरसेवक भाजप आणि एक नगरसेवक राष्ट्रवादीचा आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये सेना- भाजपचे वर्चस्व आहे़ या क्षेत्रात काही भागांमधील पाणी समस्याच, रस्त्यांवरीलर खड्डे, वाहतूककोंडी, शौचालयाचे प्रश्न अजूनही सुटलेले नसल्याने मतदार राजा यंदा कोणाच्या पारड्यात मत टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
येथून काँग्रेसचे तब्बल आठ जण इच्छुक आहेत, या इच्छुकांमधून कोणाला तिकीट द्यायचे, हे ठरविण्याचे काम सध्या सुरू आहे. काँग्रेसकडून तिकीट मिळविण्यासाठी भोमसिंग राठोड, चंद्रशेखर दुबे, राजेंद्रप्रताप
पांडे, संतोष सिंग, वीरेंद्र सिंग, संदीप सिंग, राकेश यादव, प्रेमभाई गाला इच्छुक आहेत. मनसेमधून येथून दोन वेळा निवडणूक लढलेल्या शालिनी ठाकरे आणि येथील विभाग अध्यक्ष अरुण सुर्वे इच्छुक आहेत. या विभागामध्ये मनसेलाही चांगली मते मिळाली आहेत़ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येऊन लढले, तर या निवडणुकीत नक्कीच वेगळे चित्र पाहायला मिळेल. राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास आमदार विद्या चव्हाण आणि माजी नगरसेवक अजित रावराणे हे इच्छुक आहेत. येथील शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकरदेखील या विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे.
२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिंडोशी मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू यांच्या विरोधात काँग्रेसने राजहंस सिंग यांना तिकीट दिले होते. त्यावेळी मनसेच्या उमेदवार शालिनी ठाकरे यांनी तब्बल ३९ हजार ५८७ मते घेतल्याने राजहंस सिंग यांना फायदा झाला होता. ते येथून विजयी झाले होते. यानंतर, २०१४ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या राजहंस सिंग यांच्याविरोधात सुनील प्रभू यांना पुन्हा तिकीट दिले. यावेळी भाजपने उत्तर भारतीय मोहित कंबोज (भारतीय) यांना उमेदवारी दिल्याने उत्तर भारतीय मते काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये विभागली गेल्याने सुनील प्रभू यांचा दणदणीत विजय झाला होता. यावेळी राजहंस सिंग दुसऱ्या क्रमांकावर तर यावेळी मोदी लाट असतानाही भाजपचे मोहित कंबोज (भारतीय) तिसºया क्रमांकावर गेले. या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याने राजहंस सिंग यांनी २०१६ साली काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला.
आता पुन्हा राजहंस सिंग यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, हा मतदार संघ सध्या शिवसेनेकडे असल्याने जर सेना- भाजपा युती झाली, तर हा मतदार संघ सेनेकडेच जाण्याची जास्त शक्यता आहे.
(उद्याच्या अंकात : कुर्ला मतदारसंघ)