दिग्गजांची सभांसाठी फिल्डिंग
By Admin | Published: October 1, 2014 01:15 AM2014-10-01T01:15:39+5:302014-10-01T01:15:39+5:30
मतदानासाठी अवघे 15 दिवस शिल्लक असताना राज्यभर दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्याच पाश्र्वभूमीवर मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवारांमध्येही कमालीची चुरस दिसत आहे.
>मुंबई : मतदानासाठी अवघे 15 दिवस शिल्लक असताना राज्यभर दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्याच पाश्र्वभूमीवर मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवारांमध्येही कमालीची चुरस दिसत आहे. त्यासाठी येथील काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व एएमआयएमआयतर्फे दिग्गजांच्या सभा ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सध्या तरी शिवसेनेच्या युगंधरा सालेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या दोन सभांचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. त्यात पहिली सभा 5 सप्टेंबर रोजी चार नळ, डोंगरी येथे होणार आहे. तर दुसरी सभा मुंबादेवीतील दुर्गादेवी चौकात होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वेळेअभावी दोन्ही सभांना आदित्य ठाकरे संबोधित करणार असल्याचे सालेकर यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक सभा घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मनसेचे उमेदवार इम्तियाज अनिस यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असल्याने त्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा होकार येण्याची शक्यता अनिस यांनी वर्तविली.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या ठिकाणी अजित पवार यांची सभा आयोजित करणार असल्याचे हुजैफा इलेक्ट्रिकवाला यांनी सांगितले. व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांची मात्र कोणतीही सभा या ठिकाणी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना प्रचार सभेसाठी आमंत्रित केल्याचे काँग्रेसचे उमेदवार अमिन पटेल यांनी सांगितले. अद्याप राहुल यांच्याकडून होकार मिळाला नसला तरी दिल्लीतील एका दिग्गज नेत्याची सभा या ठिकाणी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे उमेदवार अतुल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप तरी कोणत्याही नेत्याची सभा घेण्याचे निश्चित झालेले नाही. मात्र केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या किमान दोन ते तीन सभा घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
परिणामी, येत्या 15 दिवसांत मुंबादेवीत होणा:या दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे येथील वातावरण तापणार आहे. मात्र त्या सभांचा कितपत फायदा येथील उमेदवारांना होईल, हे 19 ऑक्टोबर रोजी लागणा:या निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)