भिवंडीत अपेक्षेप्रमाणे रंगणार बहुरंगी लढती
By admin | Published: May 12, 2017 01:44 AM2017-05-12T01:44:36+5:302017-05-12T01:44:36+5:30
वेगवेगळ््या पक्षांच्या उमेदवारांनी गुरूवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भिवंडीच्या निवडणुकीत बहुरंगी लढती होतील, हे स्पष्ट झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : वेगवेगळ््या पक्षांच्या उमेदवारांनी गुरूवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भिवंडीच्या निवडणुकीत बहुरंगी लढती होतील, हे स्पष्ट झाले. मात्र पालिकेच्या वेगवेगळ््या कार्यलयांतील आणि मुख्यालयातील समन्वयाच्या अभावामुळे नेमक्या किती उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि त्यामुळे प्रत्यक्ष रिंगणात किती उमेदवार उरले, याचा नेमका आकडा समजू शकला नाही.
पालिका निवडणुकीत काँग्रेस ६४, भाजपा ६३, शिवसेना ५७, समाजवादी पार्टी- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ७०, एमआयएमचे ९, कोणार्क विकास आघाडीचे २२, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्टचे १३ आणि आरपीआय एकतावादीचे ४ उमेदवार रिंगणात आहेत. शिवाय इतर छोटे पक्ष, अपक्ष रिंगणात असल्याने ही लढत बहुरंगी होणार हे स्पष्ट होते.
काँग्रेसने महापौरपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पण आम्ही या शर्यतीतून मागे हटणार नाही, अशी भूमिका प्रदेश सरचिटणीस प्रदीप पप्पू रांका यांनी घेतली.
त्याचवेळी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीनेही महापौर आमचाच होईल, असा दावा केला आहे.
भाजपाविरोधात एकासएक लढत व्हावी यासाठी वोगवेगळ््या पक्षांमध्ये चर्चा झाली असली, तरी त्यासाठी कोणीही माघार घेतली नसल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले.
भाजपाविरोधाचा अजेंडा शिवसेना, काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी, एमआयएम या सर्वांनी राबवला आहे. त्यामुळे भाजपा आणि कोणार्क आघाडीने समझोता केला असला, तरी त्यांच्याविरोधात तुल्यबळ लढत होईल, असा या पक्षांचा प्रयत्न आहे. अर्थात या पक्षांनाही फाटाफुटीचे ग्रहण लागले आहे. समाजवादी पक्षातील फुटीरांना काँग्रेसने स्थान दिले आहे. तर समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीने आपली गळती रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत.
आचारसंहिता पथकाचे दुर्लक्ष
पालिका निवडणुकीत आचारसंहितेचे कठोर पालन केले जाईल, असे निवडणूक आयोगाचे अधिकारी सांगत असले तरी त्यांच्याही कामाचा पुरता फज्जा उडाला आहे. त्यांना पालिका कार्यालयाच्या शेजारील इमारतीवरील पक्ष कार्यालयांच्या फलकांवर कारवाई करता आलेली नाही. काही नेते-उमेदवार पालिकेचे बोधचिन्ह, राजकीय पक्षाचे चिन्ह सर्रास गाड्यांना लावून फिरत आहेत.
सोशल मीडिया जोरात
ज्यांचे अर्ज छाननीत वैध ठरले त्यांनी गेल्या तीन दिवसांत आपापल्या आश्वासनांचा महापूर सोशल मीडियावर सुरू केल्याने मोबाईलधारक बेजार झाले आहेत. आपल्या कामाचे फोटो, चित्रफिती, मत देण्यासाठी संदेश, निवडून आल्यावर काय करणार या आश्वासनांचा भडीमार त्यांनी सुरू केला आहे. सोबत आपल्या पॅनेलच्या घोषणाही आहेत.
पालिकेत अनागोंदी
पालिका निवडणुकीत अर्ज भरल्यावरही त्याचा नेमका तपशील मिळालेला नव्हता. नंतर छाननीचा तपशील दोन दिवसानंतरही समजला नाही. तसाच प्रकार अर्ज माघारीवेळी झाला. नेमक्या किती जणांनी माघार घेतली, ते रात्री उशिरापर्यंत पालिका अधिकाऱ्यांना सांगता येत नव्हते. आधुनिक यंत्रणा हाती असून, अर्ज आॅनलाइन भरलेले असतानाही पालिका अधिकाऱ्यांना ही आकडेवारी देता आली नाही. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांची नेमकी संख्या, पक्षनिहाय तपशील, अपक्षांची संख्या, माघार घेणाऱ्यांची नावे यातील काहीही उपलब्ध झाले नाही.
दावेदारांनाच आव्हान
खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा निवडणूक लढवत आहे. त्यांचे पुतणे सुमीत पाटील आणि कोणार्क आघाडीचे विलास पाटील हे महापौरपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. या दोन्ही उमेदवारांविरोधात शिवसेनेने दंड थोपटले असल्याने या दोन्ही प्रभागातील लढत तुल्यबळ होईल. शिवसेनेची धुरा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रूपेश म्हात्रे, ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील सांभाळत आहेत.