मुंबई- लोअर परेल येथील कमला मिल कंपाऊंड अग्नि दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू गुदरमरल्यामुळे झाला. केईएम रुग्णालयाचे डॉक्टर राजेश डेरे यांनी ही माहिती दिली. डॉ. डेरे यांनी या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन केले. आगीपासून वाचवण्यासाठी स्वत:ला कोंडून घेतल्याने नाका, तोंडात धुर जाऊन गुदमरून मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली.
मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. या दुर्घटनेत तीन पुरुष आणि 11 महिलांचा मृत्यू झाला. आठ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून चार मृतदेह अजूनही ताब्यात देण्यात आलेले नाहीत. केईएम रुग्णालयातील सर्व जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केईएमचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, मोजोच्या खाली असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत गुदमरून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12हून अधिक जण जखमी आहेत, अशी माहिती केईएम प्रशासनानं दिली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी 4 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं असून, सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे.
रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान हॉटेल मोजोमध्ये ही आग लागली. बघता बघात आग वा-यासारखी पसरली. आजूबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात सापडला. आगीच्या घटनेमुळे कमला मिल कंपाऊंडमधला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. हॉटेल मोजोसला लागलेल्या भीषण आगीमुळे रेस्टॉरंट आणि पबचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हॉटेल लंडन टॅक्सीपर्यंत या आगीचे लोळ पोहोचले व हॉटेल लंडन टॅक्सीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. कमला मिलमधल्या हॉटेल लंडन टॅक्सीच्या टेरेसवर पब आहे. या आगीमुळे हॉटेल लंडन टॅक्सीचंही नुकसान झालं आहे.
मोजो हे रेस्टॉरंट पूर्णतः शाकाहारी असून, या रेस्टॉरंटमध्ये गुजराती, मारवाडी आणि सिंधी लोकांची गर्दी असते. मोजोच्या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबूचे बांधकाम होते. त्या बांबूंना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कमला मिल कंपाऊंडमध्ये tv9 मराठी, टाइम्स नाऊ, मुंबई मिरर सारखी मीडिया हाऊस आहेत. अचानक लागलेल्या या आगीमुळे विविध कार्यालयातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण आगीत प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली दोषी, पारुल, खुशबू मेहता-बन्सल, मनीषा शहा, प्राची खेतान, यशा ठक्कर, सरबजीत परीदा, धैर्य ललानी, विश्व ललानी या 14 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आगीच्या प्रकरणात मोजो पबच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.