चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 08:51 AM2024-10-06T08:51:27+5:302024-10-06T11:45:40+5:30
चेंबुरमध्ये चाळीतील एका घराला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.
Chembur Fire : मुंबईत पहाटेच्या सुमारास आगीची भीषण घटना समोर आली आहे. चेंबूर परिसरात चाळीतील घराला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर काहीजण जखमी देखील झाले असून त्यांना जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, एकाच कुटुंबातील सात जणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास अग्नितांडव पहायला मिळालं. सिद्धार्थ कॉलनीमधील एका चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मृतांमध्ये ७ वर्षांच्या मुलीचा आणि १० वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत घरातील लोकांना बाहेर काढलं. जखमींना राजावाडी रुग्णालताय दाखल करण्यात आलं. मात्र त्यातील सात जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान ही आग लागली. चाळीतील दुमजली घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचे म्हटलं जात आहे. त्यानंतर ही आग संपूर्ण घरात पसरत गेली. या दुमजली घरात गुप्ता कुटुंबिय राहत होते. पहाटे साखर झोपेत असताने आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आगीच्या भक्षस्थानी पडलं. या आगीत प्रेसी प्रेम गुप्ता, मंजू प्रेम गुप्ता, अनिता धर्मदेव गुप्ता, प्रेम चेदिराम गुप्ता, नरेंद्र गुप्ता, विधी चेदिराम गुप्ता, गीतादेवी धरमदेव गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. तर घरातील इतर सदस्य गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, तळमजल्यावर दुकान आणि वरच्या मजल्यावर कुटुंब राहत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने सिद्धार्थ कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.