मानखुर्द - घाटकोपर लिंक रोडवरील, मानखुर्द मंडाळा येथील कुर्ला भंगार गोदामाला आग लागल्याची घटना समजताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उप महापौर सुहास वाडकर यांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आगीच्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आज या ठिकाणी जी आग लागली आहे, ही जागा जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येत असून याठिकाणी अवैधपणे ऑईलचा साठा करण्यात येत असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका "एम/ पूर्व" विभाग कार्यालयाच्या वतीने तसेच स्थानिक नगरसेविकेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी कळविण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका व पोलिसांच्या मदतीने अनेक वेळा कारवाई सुद्धा झाली. परंतु कारवाईची पाठ फिरताच पुन्हा भूमाफिया तिथे सक्रिय होऊन अवैध अड्डे स्थापन करीत असतात. त्यातूनच आजची ही दुर्घटना घडली असल्याचे महापौरांनी सांगितले.
आजच्या या दुर्घटनेमुळे भूमाफिया टोळीचा सक्त बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने या ठिकाणी १४ पाण्याच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच "एम /पूर्व '' विभाग कार्यालयाचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी जेसीबी व इतर सर्व आवश्यक त्या साहित्यासह अग्निशमन दलाला सहकार्य करून आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आग मानवी वस्तीमध्ये अधिक पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने अधिक खबरदारी घेण्यात येत आहे.