‘बिग बी’पासून अवघ्या २० फुटांवर गोळीबार!
By admin | Published: May 23, 2015 01:56 AM2015-05-23T01:56:22+5:302015-05-23T08:30:22+5:30
दोन अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस व व्यावसायिक श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे (४२) यांच्यावर शुक्रवारी भर दुपारी दीडच्या सुमारास गोळीबार केला. ही घटना अमिताभ बच्चन चित्रीकरण करीत असलेल्या जागेपासून २० फुटांवर घडली.
मुंबई : गोरेगाव चित्रनगरीत मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस व व्यावसायिक श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे (४२) यांच्यावर शुक्रवारी भर दुपारी दीडच्या सुमारास गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना ‘बिग बी’ अमिताभ बच्चन चित्रीकरण करीत असलेल्या जागेपासून २० फुटांवर घडली.
हा हल्ला मी होतो तिथून अवघ्या २० फुटांवर घडल्याचे ट्विट अमिताभ बच्चन यांनी दुपारी तीनच्या सुमारास केले. त्यामुळे या गोळीबाराला आणखी गांभीर्य प्राप्त झाले. व्यावसायिक वादातून शिंदे यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. शिंदे यांच्यावर संध्याकाळी नानावटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
शिंदे यांच्या हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे, शस्त्राचा वापर करणे असे गुन्हे आरे सब पोलिसांनी नोंदविले आहेत. चित्रनगरीतील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बच्चन प्रत्यक्षदर्शी नाहीत!
बच्चन यांच्या टिष्ट्वटमुळे ते या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी आहेत का किंवा साक्षीदार म्हणून त्यांचा जबाब नोंदविणार का, याबाबत ‘लोकमत’ने अपर आयुक्त फत्तेसिंह पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यांच्या माहितीनुसार, बच्चन या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत. बहुधा त्यांनी या गोळीबाराबाबत ऐकले असावे. या घटनेला बरेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. घटना घडली तेव्हा बच्चन चित्रनगरीत होते का, त्यांचे शूटिंग सुरू होते का हे माहीत नसल्याचे असे पाटील यांनी सांगितले. याला सहआयुक्त देवेन भारती यांनी दुजोरा दिला.
आम्ही चित्रनगरीत शूटिंग करीत होतो. आणि आमच्यापासून २० फुटांवर गँगवॉर भडकले. गोळीबार झाला. त्यात एक ठार झाला. पोलीस सर्वत्र होते, असे ट्विट बच्चन यांनी केले. त्यानंतर तासाभराने त्यांनी या टिष्ट्वटमधील चूक सुधारली. माझे शूटिंग सुरू होते तेथे गोळीबार झाला. गोळी लागलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आहे, असे त्यांनी नवे ट्विट केले.