मुंबई : गुरुवारी भल्या पहाटे मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले. किमान पंधराएक मिनिटे हा पाऊस कोसळल्याने शहर आणि उपनगरात ठिकठिकाणच्या सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. सकाळनंतर मात्र हा पाऊस गायब झाला आणि मुंबईकर पुन्हा घामाच्या धारांनी त्रस्त झाले.
जुलैच्या शेवटी बरसलेल्या मुसळधार पावसाच्या धारा ऑगस्टच्या सुरुवातीलाही कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र वातावरणातील बदल आणि समुद्रावर निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र अशा विविध घटकांमुळे पावसाचा जोर कमी झाला. परिणामी ऑगस्टची सुरुवात कोरडीच गेली. त्यातच समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असताना मुंबईसह आसपासच्या परिसरात काही ठिकाणी पुन्हा पावसाचा मारा सुरू झाला आहे.
गुरुवारी सकाळी मुंबईकर साखरझोपेत असतानाच शहर आणि उपनगरात किमान 15 मिनिटे सरी कोसळल्या. या सरींमुळे क्रॉफर्ड मार्केट, दादर रेल्वे स्थानकाजवळील परिसर, काळाचौकी येथील सरदार हॉटेल, हिंदमाता, परळ टीटी, दादर टीटी, वडाळा, सायन, आंबोली जंक्शन या ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. मात्र त्याचा फारसा कुणाला जाच झाला नाही. दरम्यान, सकाळी पडलेल्या पावसाने नंतर मात्र उघडीप घेतल्याने डोक्यावर आलेल्या सूर्याने मुंबईकरांना घामाघूम केले. सकाळी थंडावलेली जमीन दुपारच्या उन्हाने तापली आणि सायंकाळी उशिरार्पयत मुंबईकरांना उकाडय़ाचा त्रस सहन करावा लागला. (प्रतिनिधी)