मेट्रो-३ मार्गिकेवरील पंधरावा बोगदा पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 03:51 AM2019-08-03T03:51:29+5:302019-08-03T03:51:55+5:30
३.८१४ किमीचे भुयारीकरण पूर्ण : वैतरणा-१ टीबीएमने बजावली महत्त्वपूर्ण कामगिरी
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ मार्गातील आझाद मैदान ते मुंबई सेंट्रलपर्यंत ३.८१४ किमी भुयारीकरण शुक्रवारी पूर्ण झाले. त्यामुळे डाउनलाइन बोगदा पूर्ण करणारी मेट्रो-३ प्रकल्पातील ‘वैतरणा’ ही पहिली टीबीएम मशिन ठरली आहे. केवळ २० महिन्यांत वैतारणा-१ या टनेल बोअरिंग मशिनने हा महत्त्वपूर्ण पल्ला गाठला.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत (एमएमआरसी) या मार्गिकेचे काम सुरू आहे. वैतरणा या टीबीएममार्फत जमिनीच्या २० मीटर खाली भूगर्भात बेसाल्ट आणि ब्रेसिया या कठीण दगडातून मार्गक्रमण करीत यशस्वीरीत्या हे काम करण्यात आले. या कामामध्ये २ हजार ७२० सेगमेंट रिंगचा वापर करण्यात आला असल्याचे एमएमआरसीमार्फत सांगण्यात आले. मेट्रो-३च्या मार्गातील काम पूर्ण झालेला हा पंधरावा बोगदा आहे. एमएमआरसीने आत्तापर्यंत १७ टनेल बोरिंग मशिनच्या साहाय्याने ३१ किमी भुयारीकरण पूर्ण केले आहे.
अतिशय वेगात आणि दिलेल्या वेळेत मेट्रो-३ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. ‘एचसीसी मॉस्मेट्रोस्ट्रॉय’ या समूहाद्वारे पॅकेज-२ अंतर्गत वैतरणा टीबीएम काम करीत आहे. एमएमआरसीला या मोहिमेदरम्यान कित्येक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. वैतरणा-१च्या मार्गात अनेक १४ उंच इमारती, २८ ऐतिहासिक वारसा वास्तू आणि अतिशय जुन्या इमारतींचा समावेश होता, परंतु सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आल्याचे मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे सांगितले. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता, महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.