Join us

पाचवीसह आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 6:00 AM

राज्य परीक्षा परिषदेची माहिती; वाढत्या काेराेना संसर्गामुळे विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य

ठळक मुद्देराज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य परिस्थितीत जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे २०२१ रोजी आयाेजित करण्यात आली आहे; मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देऊन परीक्षा ही पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. यासंदर्भातील माहितीपत्रक लवकरच जारी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य परिस्थितीत जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा या परीक्षेसाठी पाचवीच्या ३ लाख ८८ हजार ५२४ तर आठवीच्या २ लाख ४४ हजार ३३६ अशाप्रकारे राज्यातून एकूण ८,६१२ शाळांमधील ६ लाख ३२ हजार ८६१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळांना त्यांच्या लॉगीनवर उपलब्ध झाली आहेत. परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार हाेती; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :परीक्षाकोरोना वायरस बातम्या