Join us

EXCLUSIVE: मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'राज की बात'; युतीचा 'फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युला जरा वेगळाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 6:18 AM

मुख्यमंत्री फडणवीस यांची खास मुलाखत

यदु जोशी

मुंबई : भाजपने जिंकलेल्या १२२ जागा आणि शिवसेनेने जिंकलेल्या ६३ जागा त्या-त्या पक्षाकडेच राहातील आणि उर्वरित जागांवर ‘फिफ्टी-फिफ्टी’ होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या मुलाखतीत दिले. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेवर असून वर्धा व नागपूर जिल्ह्यात यात्रेदरम्यान त्यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. भाजपने गेल्यावेळी १२२, तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. या जागा तशाच कायम ठेवत उर्वरित १०३ जागांपैकी निम्मे-निम्मे जागांचे वाटप युतीमध्ये केले जाईल का? या प्रश्नावर ते म्हणाले की, तसे होऊ शकेल; पण युतीतील लहान मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातूनच जागा द्याव्या लागणार असल्याने आमदारांव्यतिरिक्तच्या जागांमध्ये भाजपच्या वाट्याला तुलनेने कमीच जागा येतील. आमचं सगळं ठरलंय पण काय ठरलंय ते माध्यमांना योग्यवेळी सांगायचं हेही ठरलंय, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

शिवसेनेला सोबत घेतल्यास त्यांचा पाच वर्षांत झाला तसाच त्रास राहील असे नाही वाटत?युती तोडा अशी मागणी काही ठिकाणी आहे; पण ती अजिबात तोडली जाणार नाही. स्वत:च्या सोईनुसार मित्रपक्षांना सोबत घ्यायचे वा टाकून द्यायचे हा भाजपचा संस्कार नाही. राजकारणात मित्र रोज बदलता येत नसतात. मला युतीचे सरकार चालविण्याचा चांगला अनुभव आला आहे. शिवसेनेच्या टीकेने मी कधीही विचलित होत नाही. जनतेला काय वाटतं ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. राज्याच्या विकासाच्या अजेंड्यावर मतभेद असता कामा नयेत, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षात देतील, असा माझा विश्वास आहे.

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदानाच्या मागणीसाठी विरोधी पक्ष मोर्चा काढणार आहेत...हे वर्ल्ड कपमध्ये सर्वात तळाशी राहिलेल्या टीमने अम्पायरच्या चुकीमुळे तसे झाल्याची ओरड करण्यासारखे आहे. जनतेने जो प्रचंड कौल मोदीजींना दिला त्याचा हा अपमान आहे. ईव्हीएमविरुद्ध महामोर्चा काढायला निघालेल्यांचा महापराभव झाल्याशिवाय राहणार नाही.

शरद पवार यांनी ईडीच्या चौकशीआड विरोधकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे?

ईडीबिडीचा दबाव आणण्याची गरज नाही. आपलेच नेते ईडीच्या रडारवर का आहेत, याचे आत्मचिंतन त्यांनी करावे.निवडणूक कोणत्या मुद्यांवर लढणार? पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामांच्या आधारे जनतेच्या न्यायालयात जाऊ. परकीय गुंतवणूक, रोजगार निर्मितीत आज राज्य क्रमांक एकवर आहे. निर्णयांमध्ये पारदर्शकता आणली. योजना थेट लाभार्थीपर्यंत पोहोचण्यावर भर दिला. कामगिरीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी ही जनादेश यात्रा आहे.

विदर्भ राज्याची मागणी आजही संयुक्तिक वाटते काय?स्वतंत्र विदर्भ राज्य ही भाजपची तात्विक मागणी आहे. आमचा पक्ष नेहमीच छोट्या राज्यांच्या मागणीचे समर्थन करतो, पण पाच वर्षे विकासाबाबत आम्ही ‘जय विदर्भ’च म्हटले. विदर्भ, मराठवाड्यासारख्या मागास भागाच्या विकासासाठी संधी म्हणून सत्तेकडे नेहमीच पाहू. मुळात अन्यायातून विदर्भ राज्याची मागणी होत आली. केंद्र व राज्य सरकारतर्फे पाच वर्षांत या भागात विकासाची प्रचंड कामे झाली. त्यावर लोक समाधानी आहेत. मात्र केंद्र सरकार स्वतंत्र विदर्भाबाबत योग्यवेळी निर्णय घेईल.

युती तोडण्याचा इरादा नाहीस्वबळावर लढलो तर १५० पेक्षा अधिक जागा भाजप जिंकेल, असे आमच्या पक्षाचे लोक येऊन सांगतात पण माझा तसा कोणताही विचार नाही. युतीसाठी आमचे काही नुकसान झाले तरी ते सहन करून युती केलीच जाईल. युती तोडण्याचा आमचा इरादा नाही. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाउद्धव ठाकरेनिवडणूक