संक्रमण शिबिरातील भाडेकरूंकडून पन्नास लाख रुपये वसूल, म्हाडाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:07 AM2020-01-05T01:07:34+5:302020-01-05T01:07:37+5:30
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संक्रमण शिबिरातील भाडेकरूंकडून थकीत भाडे वसूल करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संक्रमण शिबिरातील भाडेकरूंकडून थकीत भाडे वसूल करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत पन्नास लाख रुपये थकीत भाडे वसूल करण्यास म्हाडाला यश मिळाले आहे. वीस गाळ्यांमधील घुसखोरी रोखण्यातही यश मिळाले आहे. विशेष म्हणजे भाडे वसूल करण्यासाठी म्हाडाने आॅनलाइन पद्धतीने सुरुवात केली असून रहिवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांमार्फत नियमितपणे भाडे वसूल करण्यात येते, तरीही नियमितपणे आणि थकीत भाडे वसूल करण्यासाठी म्हाडाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम राबवताना आॅफलाइन सोबतच आॅनलाइनचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिथे सुविधा उपलब्ध होत आहेत, अशा ठिकाणी आॅनलाइन भाडे वसूल करण्यात मोठे यश मिळाले असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे. तसेच संक्रमण शिबिरातील घुसखोरी रोखण्यासाठी आता म्हाडाला यश आले आहे. आतापर्यंत वीसपेक्षा जास्त गाळ्यांतील अनधिकृत घुसखोरी थांबवण्यातदेखील यश आले आहे.दक्षिण मुंबईतील कुलाबा, स्वदेशी मिल, स्वान मिल, अॅण्टॉप हिल, शिवडी, ज्ञानेश्वर नगर येथील संक्रमण शिबिरातील २० घुसखोरांना गाळ्यातून बाहेर काढण्यात आले. यानंतर त्या गाळ्यांना टाळे ठोकून मूळ घरमालकांना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या असून लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.