Join us

राज्यात विलगीकरणासाठी पावणेदोन लाख बेड तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 4:32 AM

या तिनही श्रेणीतील उपचार केंद्रामध्ये तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात येऊन १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) बेड तयार ठेवण्यात आले आहेत. ७२४८ अतिदक्षता व सुमारे तीन हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध करण्यात आले आहेत. वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी ८० हजार पीपीई किट्स तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीे. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी तीन श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी केली आहे. श्रेणी- १ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय, श्रेणी- २ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय व निगा केंद्र तर श्रेणी ३ मध्ये कोविड रुग्ण निगा केंद्र यांचा समावेश होतो. या तिनही श्रेणीतील उपचार केंद्रामध्ये तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.कोरोनाबाधीत गंभीर रुग्णांसांठी श्रेणी १ मध्ये उपचार सुविधा असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी श्रेणी २ मध्ये तर ज्यांना लक्षणे नाहीत अशांसाठी श्रेणी ३ मध्ये उपचार होतील. राज्यात श्रेणी १ चे २४६ अधिकृत कोरोना रुग्णालये असून त्यामध्ये एकूण ३२ हजार ८६१ विलगीकरण खाटा आहेत, त्यात अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे.श्रेणी २ मधील ५१७ अधिकृत कोरोना रुग्णालय व निगा केंद्र कार्यरत असून त्यात अतिदक्षता विभागातील खाटा मिळून ३१ हजार विलगीकरण खाटा आहेत. श्रेणी ३ मधील ९१४ कोरोना रुग्ण निगा केंद्र कार्यरत आहेत. त्यात १ लाख २० हजार ६११ विलगीकरण खाटा आहेत. अशाप्रकारे राज्यात एकूण १६७७ रुग्णालये तीनही श्रेणीतील असून त्यात १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटा आहेत. त्यामध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी ६२ हजार ६४० तर कोरोनाबाधीतांसाठी १ लाख १३ हजार ७०७ विलगीकरण खाटांचा समावेश आहे. या तिन्ही श्रेणीतील रुग्णालयांसाठी खाटांची, पीपीई, किट्स तसेच व्हेंटीलेटर्सची संख्या पुरेशी आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या