पन्नास वर्षीय व्यक्तीने दिले तिघांना जीवनदान, नव्या वर्षातील पहिले अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:13 AM2021-01-08T04:13:47+5:302021-01-08T04:13:47+5:30
मुंबई : मुलुंड येथील ५० वर्षीय उद्योगपतीच्या कुटुंबामुळे २०२१चे पहिले कॅडव्हेरिक अवयवदान शक्य झाले. कुटुंबाने त्याचे मूत्रपिंड, यकृत व ...
मुंबई : मुलुंड येथील ५० वर्षीय उद्योगपतीच्या कुटुंबामुळे २०२१चे पहिले कॅडव्हेरिक अवयवदान शक्य झाले. कुटुंबाने त्याचे मूत्रपिंड, यकृत व त्वचा दान करण्याला संमती दिली. अवयव दाता पोस्टरियर सर्कुलेशन स्ट्रोकने पीडित होता. त्याला मुलुंड येथील खासगी रुग्णालयात ब्रेनडेड घोषित करण्यात आले. डॉक्टर्स व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्या कुटुंबासोबत समुपदेशन केले, यानंतर दात्याची पत्नी व भावाने त्याचे अवयव दान करण्याला संमती दिली.
सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ महामारीच्या प्रादुर्भावादरम्यान सर्जिकल व नॉन-सर्जिकल टीम्स, झेडटीसीसी मुंबई, परिचारिका टीम्स, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले. ऑर्गन रिट्रायव्हलची प्रक्रिया करण्यात आली. हार्वेस्ट करण्यात आलेल्या अवयवांपैकी एक मूत्रपिंड व यकृत मुलुंड येथील रुग्णालयाला देण्यात आले, तर एक मूत्रपिंड दुसऱ्या शहरातील रुग्णालयात नेण्यात आले आणि त्वचा ऐरोली येथील त्वचा पेढीत पाठविण्यात आली.
मुलुंड येथील रुग्णालयाचे डॉ. स्वप्निल शर्मा यांनी यकृत रिट्राइव्ह केला. मुलुंड येथील रुग्णालयामधील लिव्हर ट्रान्सप्लाण्ट ॲण्ड एचपीबी सर्जरी विभागाचे सल्लागार व प्रमुख सर्जन डॉ. गौरव गुप्ता यांनी मुंबईतील बोरीवली येथील इन-हाऊस प्राप्तकर्ता ६० वर्षीय पुरुष रुग्णामध्ये यकृत प्रत्यारोपण केले. निवृत्त व्यावसायिक असलेला हा रुग्ण नॉन-अल्कोहोलिक स्टेटोहेपटायटिस (एनएएसएच) सिर्होसिससह निदान झाल्यानंतर डिसेंबर २०२० पासून यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत होता. दान करण्यात आलेले आणखी एक मूत्रपिंड मुंबईतील भांडुप येथील आणखी ६७ वर्षीय पुरुष प्राप्तकर्त्यामध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. हा रुग्ण एण्ड-स्टेज रेनल डिसीजसह (ईएसआरडी) निदान झाल्यानंतर ऑगस्ट २०१४ पासून प्रतीक्षेत होता.
मुलुंड येथील रुग्णालयातील कन्सल्टंट युरोलॉजिस्ट्स डॉ. रमेश महाजन आणि डॉ. सौरभ पाटील यांनी मूत्रपिंड रिट्रायव्हल व प्रत्यारोपण केले. प्रत्यारोपण व अवयव दानाची प्रतीक्षा करत असलेल्या अवयव निकामी होण्याच्या त्रासाने पीडित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी पोकळी आहे. बहुतांश रुग्णांचा अवयवासाठी प्रतीक्षा करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि प्रत्येक कॅडव्हेरिक दान ही पोकळी भरून काढण्याच्या दिशेने मोठे सकारात्मक पाऊल आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.