लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित महाराष्ट्रावर वातावरणीय बदलाचा, नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी व्हावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार, वातावरण बदलाविरुद्धचा लढा आणखी बळकट करण्यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय अंडर २ कॉएलेशनमध्ये सामील झाला आहे. अंडर २ कॉएलेशनशी जोडले जाणारे महाराष्ट्र हे जगातील १२५ वे राज्य आहे. छत्तीसगड, जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश, तेलंगणा व पश्चिम बंगाल ही इतर ५ राज्ये अंडर २ कॉएलेशनमध्ये सामील झाली आहेत.
महाराष्ट्राला वातावरण बदल व त्याच्या परिणामांचा फार मोठा धोका आहे. ५० वर्षांत राज्यात दुष्काळ पडण्याचे प्रमाण ७ पटींनी, पूर येण्याचे प्रमाण ५ पटींनी वाढले आहे. राज्याच्या वातावरण बदल कृती धोरणात वातावरण बदल कमी करण्यासाठी विस्तृत योजनांचा समावेश करण्यात आला आहे. आरे जंगल वाचवणे, राज्यभरात ९ हजार ८०० हेक्टर कांदळवन संरक्षित करणे, असे उपाय करण्यात येत आहेत. जगभरात अशी संकटे येत आहेत. आणि यांना तोंड देण्यासाठी, जागतिक वातावरण बदल थांबवण्यासाठी पॅरिस करारानुसार कॉएलेशन आराखडा बनवत आहे. अंडर २ कॉएलेशनमध्ये २०० हून अधिक सरकारी संस्था एकत्र घेऊन वातावरण बदल थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वातावरण बदल थांबवण्याच्या दृष्टीने हे दशक अतिशय महत्त्वाचे असणार आहे.
--------------------
आम्ही जगभरातील विविध सरकारी व इतर संस्थांबरोबर एकत्र येऊन जागतिक वातावरण बदल थांबवण्यासाठी प्रयत्नशील असू. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. वातावरण बदल थांबवण्यासाठी राज्याचे स्वतःचे अनुभवही आम्ही इतर सरकारांसोबत शेअर करू.
- आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र
अंडर २ कॉएलेशन काय करते?
- वातावरण बदल रोखण्यासाठी नवनवीन मार्ग शोधते
- योजना आखते
- व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणते
- शाश्वत विकासासाठी राज्यांना मदत करते
- शहरांसाठी नेट झिरो लक्ष्य ठेवते
- पर्यावरण संवर्धन उपक्रमांसाठी निधी उभारण्यास मदत करते
अंडर २ कॉएलेशन म्हणजे?
अंडर २ कॉएलेशन राष्ट्रीय व राज्य सरकारांची युती आहे. जी तापमानवाढ २ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. कॉएलेशनसोबत जगातील २३० सरकारी संस्था जोडल्या आहेत. यात पॅरिस करारानुसार काम करणाऱ्या देशांचाही समावेश आहे.