उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यात होणार लढत
By मनोहर कुंभेजकर | Published: April 30, 2024 05:27 PM2024-04-30T17:27:21+5:302024-04-30T17:31:39+5:30
या मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे आणि येथील मतदारांचे लक्ष लागले होते.
मनोहर कुंभेजकर, मुंबई-लोकसभा निवडणूक - २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिंदे सेनेतून गेले काही दिवस या मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे आणि येथील मतदारांचे लक्ष लागले होते.
या मतदार संघातून जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर,माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत,माजी खासदार संजय निरुपम, अभिनेते सचिन खेडेकर व अभिनेते शरद पोंक्षे यांची नावे चर्चेत होती.मात्र शिंदे सेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आज येथील अधिकृत उमेदवार म्हणून आमदार वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले.लोकमतने वायकर यांना उमेदवारी मिळणार असे वृत्त आधी दिले होते,यावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले.
त्यामुळे या मतदार संघात उद्धव सेनेचे उमेद्वार अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यात थेट लढत होणार आहे. आज सकाळी वायकर यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील मातोश्री क्लब मध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यानी व हितचिंतकांनी गर्दी केली होती.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दि,9 मार्च रोजी या मतदार संघातील शाखा शाखांच्या भेटीत अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित केली होती.त्यानंतर त्यांनी मतदार संघ पिंजून काढत आणि शिवसैनिकांनी घरोघरी प्रचार करत त्यांच्या प्रचाराचे दोन टप्पे पूर्ण झाले आहे.तर येत्या दि,3 मे रोजी रवींद्र वायकर हे त्यांचा निवडणूक अर्ज भरणार आहेत.गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना त्यांनी उमेदवारीला होकार दिल्यावर त्यांच्या मतदार संघात गाठी त्यांनी गाठी भेटी सुरू केल्या होत्या.येत्या 16-17 दिवसात त्यांना सुमारे 17.5 लाख लोकसंख्या असलेला हा मतदार संघ पिंजून काढायचा आहे.
या मतदार संघात अंधेरी पश्चिम मधून आमदार अमित साटम, वर्सोव्यातून आमदार डॉ.भारती लव्हेकर, गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर हे भाजपाचे तीन आमदार असून स्वतः शिंदे सेनेचे आमदार रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे प्रतिनिधींत्व करतात.दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वच्या आमदार ऋतुजा लटके हे उद्धव सेनेचे दोन आमदार असे या मतदारसंघाचे बलाबल आहे. तर अमोल कीर्तिकर यांचे वडील व शिंदे सेनेचे खासदार गजानन कीर्तिकर या लोकसभेचे सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करत आहेत.