मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले असून, यामुळे मात्र हातावर पोट असलेल्या प्रत्येकाचे हाल सुरु झाले आहेत. यावर उपाय म्हणून ठिकठिकाणी अन्न दानाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले असून, जेथे अधिक संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत; अशा धारावीसह लगतच्या वस्तीमध्ये अन्नदानाचा वेग वाढला आहे. धारावी व्यतीरिक्त मुंबईच्या कानाकोप-यात धान्य वाटप, अन्न वाटप आणि इतर साहित्य दिले जात असून, उत्तरोत्तर यात वाढच होत आहे.चेंबूर येथे असलेल्या आयसीएसई स्कूल, द ग्रीन एकर्स अकॅडमीने, विद्यार्थी व पालकांसह, वंचित व निराधार आणि कामगारांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. याद्वारे शिजवलेल्या जेवणाची पाकिटे वितरीत होत आहेत. यास नगरसेविका आशा मराठे यांचेही सहकार्य मिळाले आहे. दररोज २५० जेवणाच्या पॅकेट्ससह सुरू झालेले कार्य, आता वाढून दिवसाला एक हजार पॅकेट होत आहे. आणि आता ५ हजार एवढे होणार आहे, अशी माहिती ग्रीन एकर्स अकॅडमीचे संचालक रोहन पारीख यांनी दिली. सध्या शाळेचे विद्यार्थी आणि पालक आपापल्या स्वयंपाकघरात दहा ते पंधरा जणांचा स्वयंपाक करतात आणि नंतर सुरक्षित अंतर ठेवत त्याचे वितरण करतात.नायर रुग्णालयाला येथील रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या पेपर प्लेट्स व पेपर ग्लास यांची निकड लक्षात घेऊन लालबाग परिसरातील राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या वतीने एक हजार पेपर प्लेट व पेपर ग्लास यांचे वितरण करण्यात आले. लालबाग परिसरात राहणा-या नायर रुग्णालयातील परिचारिका प्रियांका हातगे यांनी रुग्णालयाला प्लेट्स आणि पिण्याच्या पाण्यासाठी ग्लासची आवश्यकता असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद आंबेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर त्यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून एक हजार प्लेट्स आणि ग्लास यांची व्यवस्था करून रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांकरिता सुपूर्द करण्यात आले.लॉकडाऊनमुळे संघटित नाका मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन आपल्या परीने रेशन वाटप करत आहे. मात्र या कामगारांकडे ना रेशन कार्ड आहे ना आधार कार्ड. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही उपक्रमाचा यांना फायदा मिळत नाही. सध्या असे अडिचशे ते तीनशे नाका मजूर वांद्रे ते बोरीवली दरम्यान विविध ठिकाणी अन्नपाण्याविना त्रस्त आहेत. बाहेर आले तर पोलीस मार आणि घरात बसले तर उपासमार अशा दुहेरी कोंडीत हे मजूर सापडले आहेत. अखिल भारतीय श्रमशक्ती संघटनेचे मुंबई अध्यक्ष रमेश चौवल यांनी १ हजार किलो तांदूळ, शंभर किलो डाळ व शंभर पिशवी तेल असे वाटप विलेपार्ले येथे या मजूरांना केले आहे.मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी धारावी येथील प्रेमनगर परिसरात ५० किलो तांदूळ आणि ५० किलो गहू असे वितरित केले. यापूर्वी त्यांनी विविध ठिकाणी दिड हजार किलो धान्याचे वितरण केले असून, आता आणखी दिड हजार धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. थम्पिंग रायडर्स नावाचा ग्रुप कोरोनाविरोधात लढत आहे. मुंबई आणि पुण्याचे रायडर्स यामध्ये आहेत. किमान १ हजार ६०० लोक यात आहेत, असे ग्रुप लीडर प्रशांत गोरीवले यांनी सांगितले. तर रेणूका नाटके यांनी सांगितले की, आम्ही वांद्रे येथील गरजू कुटूंबांना मदत केली. यामध्ये तांदूळ, बिस्किट, पोहे आदी वितरण केले होते. धारावीमध्ये आम्ही बिस्किट आणि लस्सीचे वितरण केले.चेंबूर सिटीझन ग्रुपचे सदस्य भुपेंदर यांनी सांगितले की, मदर तेरेसा यांनी म्हटले आहे की, तुम्ही जर शंभर लोकांना जेवण घालू शकत नसाल तर एका व्यक्तीला जेवण द्या तेही पुरेसे आहे. आम्ही ग्रुपच्या वतीने लॉकडाऊन काळात बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना दिलासा मिळावा यासाठी नाष्टाची सोय केली. परंतु त्यानंतर हे कमी आहे असे आम्हाला जाणवले. गरजू आणि बेघरांची उपासमार होत असल्याचे लक्षात आले. स्वखर्चातून आम्ही १० किलो धान्य आणून त्यांच्यासाठी पुरीभाजीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर देवनार,वाशीनाका,भारतनगर आदी परिसरातून फोन आले त्यानुसार अन्न वाटप करण्यात आले.आता अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत पण आम्ही आर्थिक मदत घेत नाहीत केवळ धान्य स्वीकारत आहोत. धान्य आणि विविध आवश्यक वस्तू नागरिकांसाठी देत आहेत. प्रत्येकजण यामध्ये आपापले योगदान देत आहे. महात्मा एज्युकेशन सोसायटीचे वासुदेवन पिल्लई आणि अन्नमा पॉल यांनी जेवण बनवण्यासाठी शाळेतील किचन दिले आहे. तर चेंबूर येथील पेट्रोलपंप कर्मचारी तेथे जेवण बनवत आहेत. सूरज शाह यांनी अन्न वाटपसाठी वाहतुकीची व्यवस्था केली आहे. या मदतीसाठी इंदरपाल खालसा,भारती अययर,बीपीसीएलचे विनीत आहुजा आदी व्यक्तीने मदतीचा हातभार लावला आहे.-----------------------------------भाजी घेण्यास गर्दी : वेळ वाढवण्याच्या नागरिकांच्या सुचनाअंधेरी पूर्व येथील शेर ए पंजाब येथील मैदानात भाजी घेण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याने केंद्र सरकारने सोशल डिस्टअन्स पाळण्याच्या आवाहनाचा फज्जा उडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळच्या सुमारास फक्त तीनच तास हे मैदान भाजी विक्रीसाठी खुले असते, जर या कालावधीमध्ये वाढ केली तर गर्दी कमी होऊ शकेल असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.