‘सुपर सेव्हर’ बनून कोरोना मुक्तीसाठी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:08 AM2021-04-30T04:08:14+5:302021-04-30T04:08:14+5:30
राष्ट्रीय जनस्वास्थ्य प्रशिक्षण संशोधन संस्था संचालकांचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रुग्णाच्या मदतीला जाे धावून येतो तो ‘सुपर ...
राष्ट्रीय जनस्वास्थ्य प्रशिक्षण संशोधन संस्था संचालकांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रुग्णाच्या मदतीला जाे धावून येतो तो ‘सुपर सेव्हर’ असतो. कोरोना महामारीच्या काळात समाजाला वाचविण्यासाठी सुपर सेव्हरची गरज असून, समाजातील प्रत्येक व्यक्तीने सुपर सेव्हर बनून कोरोनापासून मुक्ती मिळविण्यासाठी लढायला हवे, असे आवाहन राष्ट्रीय जनस्वास्थ्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दीपक राऊत यांनी केले.
संस्थेने सामाजिक संस्था, स्वयंसेवकांसाठी आयोजित केलेल्या ‘काेविड १९ सुपर सेव्हर प्रशिक्षण’ या नुकत्याच आयाेजित केलेल्या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना डॉ. राऊत यांनी सांगितले की, सध्याच्या कोरोना संसर्गात नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन समाजाला जागृत करायला हवे. नियमांचे पालन करण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. महामारीच्या काळात, रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम सामाजिक संस्था, स्वयंसेवक करू शकतात. नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून अधिकाधिक लसीकरण होईल यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाला डॉ. मुजफ्फर अहमद, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे माजी सदस्य, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय जन स्वास्थ्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, मुंबई या भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या संस्थेने, विविध सामाजिक, धार्मिक संस्था, युवक संस्था, महिला मंडळे आणि स्वयंसेवक यांच्यासाठी काेविड १९ साठी सुपर सेव्हर प्रशिक्षण या वेबिनारचे आयोजन केले. यात देशभरातील सुमारे २५० प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सर्वसामान्यांनीही पुढाकार घेऊन काम करायला हवे. या आजाराच्या उद्रेकाने जी भीती निर्माण झाली आहे, ती दूर करण्यासाठी अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करायला हवे, असे यावेळी डॉ. मुजफ्फर अहमद यांनी नमूद केले.
या प्रशिक्षण सत्रात संस्थेच्या डॉ. सुपर्णा खेरा यांनी कोविडची देशातील वर्तमान स्थिती आणि नवीन आढळून येणारी लक्षणे याविषयी माहिती दिली. रोजी जोसेफ यांनी कोरोनाबाधित रुग्णांची काळजी कशी घ्यावी, गृह विलगीकरण म्हणजे काय, कुठल्या प्रसंगी रुग्णांना रुग्णालयात न्यायला हवे, याविषयी सविस्तर माहिती दिली. तर, डॉ. सुधीर वंजे यांनी देशातील लसीकरण कार्यक्रम, कुठल्या लसी उपलब्ध आहेत, लसीकरणासाठी कशी नोंदणी करावी, तसेच लसीकरण झाल्यावर काय काळजी घ्यावी, हे सांगितले. संस्थेचे संजय भोंगे यांनी, सुपर सेव्हर म्हणून समाजातील प्रत्येक नागरिक काय भूमिका बजावू शकतो, याची माहिती दिली.
................................