जंग मुश्किल तो है , जित जायेंगे कल ....इस कोरोना को फिर अलविदा , अलविदा .... !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 08:55 PM2020-06-06T20:55:04+5:302020-06-10T14:18:50+5:30
कोरोना काळात सामान्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून गाण्याची निर्मिती
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगासह देशावर संकटकालीन परिस्थिती उद्भवली असून याचा परिणाम भारतासह इतर देशांत देशव्यापी लॉकडाऊनमध्ये झाला आहे. या भयावह परिस्थितीमुळे अनेकांमध्ये मानसिक आरोग्याच्या, अन्नधान्याच्या, गरजूना पोटभर जेवणाच्या समस्या उद्भवत असताना या सगळ्यासाठी समस्यांसाठी मुंबई विद्यापीठ विद्यापीठ सरसावले आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांकडून काही ना काही उपक्रम होत असताना विद्यार्थी विकास विभाग ही मागे राहिला नसून या काळात लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी आदर्श शिंदेसह इतर १६ गायकांना घेऊन गाणे तयार केले आहे. विशेष म्हणजे आज यातील प्रत्येकजण लॉकडाऊनमध्ये असताना घरी बसून नकारात्मकतेकडून सकारात्मक विचारांकडे नेणाऱ्या या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोक घरात बसून कंटाळले आहेत तर दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी बहुतांश लोकांमध्ये भीतीचे आणि नकारात्मक वातावरण दिसून येत असताना ते घालवण्यासाठी अनेक कलाकार एकत्र येऊन लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी काही न काही कलाकृती करत आहेत. अशातच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे समनव्यक निलेश सावे यांच्या संकल्पनेतून या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे गाणे करताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक सुनील पाटील यांनी या गाण्याची निर्मितीसाठी विशेष योगदान दिल्याची माहिती विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक निलेश सावे यांनी दिली. कोरोनाच्या काळात अनेकांना नैराश्य आणि नकारात्मक विचारांनी ग्रासलेल असताना अनेकांना हा काळ कधी सरतो असे वाटत आहे यावर दृष्टीक्षेप टाकणारा आणि नकारात्मकते कडून सकारात्मक विचारांकडे नेणार हे गाणं आहे. मुंबई युनिव्हर्सिटीसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी गीत लेखन करणारे करणारे जमीर प्रतापगडी यांनी या गाण्याचे लेखन केले आहे.
हे गाणे लॉकडाऊनच्या काळात तयार केले असून हे गाणे तयार करण्यासाठी अनेक आजी माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आहे. फक्त गाण्याच्या ऑडिओने या गाण्याचा प्रभाव मर्यादित राहू शकतो म्हणून या गाण्याची चित्रफीत बनवण्याची धुरा निलेश सावे, निलेश गोपणारायन यांच्या सोबत सुश्रुत म्हसकर यांनी सांभाळली. गाण्याविषयी सर्व गोष्टी या पूर्णपणे फोनवर बोलून ठरवण्यात आल्या या गाण्याच्या निर्मितीची अर्धी प्रोसेस तर फोनवरच झाली. गाण्याच्या चित्रफितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या व एनएसएसने वाटलेल्या फूड कॅम्प्सचे फोटो वापरण्यात आले असून. डॉक्टर्स ,नर्सेस यांच्या कार्याची दखल या गाण्यात घेण्यात आली आहे. या गाण्याला दत्ता मेस्त्री याने संगीतबद्ध केले असून, नीलामाधव मोहपात्रा याने गाणं तयार केल्याची माहितीही सावे यांनी दिली. मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू रविंद्र कुलकर्णी आणि कुल सचिव अजय देशमुख यांचे ही या गाण्यासाठी मार्गदर्शन मिळाले आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी तसेच मुंबई युनिव्हर्सिटीचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याने सुद्धा या गाण्यासाठी आपला आवाज दिला आहे.
..............................................
मुंबई विद्यापीठाने नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करत आहे. संपुर्ण देशावर सध्या कोरोनाची एक वेगळी भीती निर्माण झालेली आहे असे असताना सकारात्मक विचार सगळ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी या गाण्याची निर्मिती आम्ही केली आहे. कोरोनाचे सावट कधी दूर होईल अपल्यावरून ते सांगता नाही येणार मात्र या नकारात्मक विचारांचे सावट आपण दूर करूच शकतो त्यासाठी आम्ही केलेला हा छोटा प्रयत्न आहे.
- निलेश सावे , समनव्यक, मुंबई युनिव्हर्सिटी विद्यार्थी विकास विभाग