Join us

घरगुती वीज बिल सवलतीसाठी लढा सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:05 AM

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अधिवेशनाच्या सुरुवातीला थकबाकीदार वीज ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यास स्थगिती ...

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अधिवेशनाच्या सुरुवातीला थकबाकीदार वीज ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यास स्थगिती देणे आणि शेवटच्या दिवशी स्थगिती उठविणे ही राज्यातील काेराेना संकटात अडकलेल्या गरीब सव्वादोन कोटी वीज ग्राहकांची क्रूर चेष्टा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली. तसेच घरगुती वीज बिल सवलतीसाठी लढा सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.

वीज प्रश्नांवर कोणतीही चर्चा झाली नाही. या सर्व घटना अत्यंत वाईट असून, राज्यातील काेराेना संकट काळातील गरीब जनतेच्या दु:खावर डागण्या देणाऱ्या आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ज्यांचा रोजगार व कमाई पूर्णपणे थांबली, अशा गरिबांना कोणताही दिलासा दिला जात नाही. उलट यासंदर्भात राज्य सरकारमधील अंतर्गत वाद व श्रेयवाद यासाठी गरीब जनतेचा बळी दिला जात आहे.

केरळ, मध्य प्रदेश व गुजरातमध्ये घरगुती वीज बिलांमध्ये ६ महिन्यांसाठी ५० टक्के सवलत आहे. कर्नाटक सरकारने रिक्षा चालक, टॅक्सी चालक, फळ भाजी विक्रेते, बांधकाम व यंत्रमाग कामगार या सर्व गरीब, कष्टकरी तसेच रोजंदारीवर जगणाऱ्या घटकांना रोख मदत दिली आहे. अनेक राज्य सरकारांनी औद्योगिक ग्राहकांना स्थिर आकारात सवलत दिली. महाराष्ट्र सरकारने कोणत्याही घटकांस कोणतीही सवलत दिलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, १९ मार्च रोजी म्हणजे शेतकरी आत्महत्या स्मृतिदिनी राज्यस्तरीय ‘हाय वे रोको’ आंदोलन करण्यात येईल. जेथे राष्ट्रीय महामार्ग नाही तेथे ‘राज्य महामार्ग रोको’ अथवा ‘जिल्हा महामार्ग रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.