चेंबूर येथील वयोवृद्ध दाम्पत्याचा पोलीस यंत्रणेशी लढा
By admin | Published: April 3, 2015 03:12 AM2015-04-03T03:12:32+5:302015-04-03T03:12:32+5:30
कुटुंबातील कर्ताधर्ता असलेल्या मुलाचा मृत्यू हा अपघाती नाही, तर त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा करत एका वयोवृद्ध दाम्पत्याने गेल्या दोन वर्षांपासून
मनीषा म्हात्रे, मुंबई
कुटुंबातील कर्ताधर्ता असलेल्या मुलाचा मृत्यू हा अपघाती नाही, तर त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा करत एका वयोवृद्ध दाम्पत्याने गेल्या दोन वर्षांपासून न्यायासाठी पोलीस यंत्रणेशी लढा सुरू ठेवला आहे. चेंबूरच्या टाटा कॉलनी येथे राहणाऱ्या घाटविसावे दाम्पत्याची ही कहाणी पोलीस आयुक्तांच्या कानावर पडली आणि हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे या दाम्पत्याला न्याय मिळण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
चेंबूरच्या टाटा कॉलनीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे वयोवृद्ध घाटविसावे कुटुंब. कुटुंबप्रमुख बन्सी, पत्नी सुभद्रा आणि मुलगा सतीशसह राहत होते. घरातील कर्ता मुलगा असलेल्या सतीशवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. बँड पथकामध्ये काम करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून सतीश घरखर्च आणि स्वत:ची हौसमौज भागवत होता. घराबाहेर पडलेल्या सतीशला घरच्यांनी कधी अडवले नाही, मात्र घरी येण्यास थोडा जरी उशीर झाला झाला तर या दाम्पत्याच्या मनात चिंतेचे काहूर सुरू व्हायचे. याच दरम्यान लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी २९ नोव्हेंबर २०१३ रोजी घराबाहेर पडलेला सतीश घरी परतलाच नाही. ईस्टर्न फ्रीवेवरील इलेक्ट्रिक पोलला धडक होऊन सतीशच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात २३ वर्षीय सतीशसह त्याचा सहकारी दीपक राजगुरूचाही मृत्यू झाला. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी सतीशविरोधात गुन्हा दाखल करून स्वत:सह मित्राच्या मृत्यूस जबाबदार झाल्याची नोंद करत तपास थांबवला.
मात्र याला आक्षेप घेत घाटविसावे दाम्पत्याने मुलाचा अपघात नसून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. याचा तपास करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र पोलिसांनी याची दखल घेतली नाही. याच नैराश्यातून अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ६५ वर्षीय बन्सी यांनी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पत्नीने वेळीच धाव घेतल्यामुळे ते बचावले, पण तेव्हापासून कायमचे अंथरु णाला खिळले. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, घरातून निघतेवेळी पाच मित्रांसोबत सतीश घराबाहेर पडला. एवढ्या मोठ्या अपघातात सतीशचे धड आणि डोके वेगवेगळ्या अवस्थेत आढळून आले. अपघातग्रस्त बाइक मात्र जैसे थे होती. त्यामुळे त्याचा अपघातात मृत्यू झाला, हे समजणे कठीण आहे. त्यातही त्याच्या अंगावर असलेल्या जखमांमुळे हा संशय आणखीन बळावला. घटनेच्या आदल्या रात्री सतीशचा त्याच्या बँड पथकातील मित्रांसोबत पैशावरून किरकोळ वाद झाला होता. या वादातून दर्शनाच्या बहाण्याने नेऊन त्याची हत्या करण्यात आल्याचा संंशय या दाम्पत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला.
आंदोलने, उपोषण केल्यानंतरही न्याय मिळाल्याने तसेच न्यायालयात दावा ठोकण्यासाठी पैसे नसल्याने या दाम्पत्याने दोन वर्षांत स्थानिक पोलीस ठाण्यापासून मंत्रालयापर्यंतच्या पायऱ्या झिजवल्या. घरातील होते नव्हते ते सारे दागिने विकण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली. मुलाला न्याय मिळाला नाही. अजूनही न्यायासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप डाळ यांच्याकडे विचारणा केली असता, गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याचे सांगून या प्रकरणी अधिक बोलणे टाळले.