लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात २००७ पासून फिरतोय, प्रत्येक दौऱ्यात आरक्षण का हवे, याबाबत जनजागृती केली. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. मी अठरा पगड जात, १२ बलुतेदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब मराठ्यांसाठी माझा लढा आहे. समाजासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन उभे राहिले, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानात शनिवारपासून उपोषण सुरू केले आहे, त्यावेळी ते बोलत होते. आम्ही १७ जूनला ज्या मागण्या केल्या होत्या, त्याच मागण्या कायम आहेत. त्यात तसूभरही बदल केला नाही; पण सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, असे संभाजीराजे यांनी सांगितले. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, मी महाराजांचा वंशज, हा लढा मी लढायलाच हवा. अनेक आंदोलने केली. सरकारकडे मागण्या दिल्या; पण सरकारने शब्द पाळला नाही. शब्द न पाळल्याने मला दुसरा पर्याय राहिला नाही. मी जी चळवळ सुरू केली, त्यात समाज वेठीस धरला जाऊ नये म्हणून मी एकट्याने आंदोलन करायचा निर्णय घेतला आहे.
सरकारने समाजाची दिशाभूल करू नये
मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे; पण याला संभाजीराजे यांनी विरोध दर्शविला. एक मागासवर्गीय आयोग असताना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाची दिशाभूल करू नये, असे संभाजीराजे यांनी सांगितले.