Join us

हाईटवरून फाईट... वडिलांना चिडवल्याने जाब विचारण्यास गेलेल्या मुलाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 4:49 PM

विक्रोळीतील टागोर नगर येथील धक्कादायक घटना 

मुंबई - वडिलांना त्यांच्या उंचीवरून चिडवल्याने मुलाने जाब विचारला आणि टवाळ मुलांनी केलेल्या जबर मारहाणीत त्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात खुनाचा दाखल असून पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

विक्रोळीतील टागोर नगरमधील फणसेकर चाळ येथे राहणाऱ्या ६० वर्षीय वाघजी राठोड यांना त्यांच्या उंचीवरून काही टवाळखोर मुलांनी चिडवले. त्यानंतर त्या मुलांच्या पालकांनी राठोड यांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर तोच राग मनात धरून टवाळ मुलांनी राठोड यांच्या वयाची पर्वा न करता शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण केली. घडला सर्व प्रकार  राठोड यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच जयेशला (वय - ३०) सांगितले. त्यानंतर वडिलांना मारहाण केल्याबाबत जाब विचारायला गेलेल्या जयेशला काल पहाटे घरासमोर गल्लीत पाच जणांच्या समूहाने त्याच्या छाती आणि डोक्यावर लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली. जयेशच्या वडिलांची उंची सहा फुटांपेक्षा जास्त आहे. म्हणून त्या परिसरातील टवाळ मुलं लंबू म्हणून चिडवत असत. बुधवारी देखील असाच प्रकार घडला असता त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात याची तक्रारही केली होती. जयेशला जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्याने विभागातील या चिडविणाऱ्या तरुणांना जाब विचारण्याच्या प्रयत्न केला. माझ्या वडिलांना चिडवू नका असे सांगू लागला. परंतु याचे पर्यवसन हाणामारीत झाले. एकट्या जयेशला नितेश माने(३४), अनिकेत शेटे(२२), प्रथमेश शेटे(२४), साहिल बालन(२०) आणि जय कांबळे(२०) यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जयेशला गंभीर जखमी झाला आणि खाली कोसळला. त्याला विक्रोळी येथील महात्मा फुले पालिका रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पाच हि आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. भा. दं. वि. कलम ३०२, १४३, १४७, १४९ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. अगदी शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत जयेशचा जीव गेल्याने या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.     

टॅग्स :मुंबईगुन्हाखूनअटक