Join us

जखमी कुत्रीसाठी तरुणींचा लढा

By admin | Published: January 03, 2017 5:59 AM

मुंबईतील भटक्या कुत्र्यांकडे नेहमीच आपण एका तिरस्काराच्या नजरेने पाहत असतो. अशाच एका जखमी कुत्रीसाठी मुंबईतील पाच तरुण-तरुणी एकत्र आले

मनीषा म्हात्रे, मुंबईमुंबईतील भटक्या कुत्र्यांकडे नेहमीच आपण एका तिरस्काराच्या नजरेने पाहत असतो. अशाच एका जखमी कुत्रीसाठी मुंबईतील पाच तरुण-तरुणी एकत्र आले. त्याच्या उपचारासाठी पॉकीट मनी तसेच पगारातून काटकसरीतून पै - पै गोळा केले. मात्र सध्या गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल केलेल्या कुत्र्याच्या उपचाराच्या प्रतीक्षेत त्यांच्यावर हेलपाटे मारण्याची वेळ ओढवली आहे. मुंबईतील शाळा, कॉलेज तसेच नोकरी करत असलेली निशिता कर्वे, सुवर्णा कल्याणी, गौरांग दामले, रुचिका धोपकर आणि ज्ञानदा या पाच जणांचा ग्रुप. शाळा, कॉलेज तसेच नोकरीमध्ये दैनंदिन जीवन जगणारी ही मंडळी. मात्र रस्त्यांवरील एका जखमी कुत्र्यामुळे ते एकत्र आले. वाडीबंदर परिसरात १५ डिसेंबरला ट्युमरच्या आजाराने ग्रासलेला कुत्रा सुवर्णाच्या नजरेत पडला. त्याला सगळेच तिरस्काराने हकलत होते. यातच तिने त्याला जवळ घेतले. थेट परळच्या पशु वैद्यकीय रुग्णालयात त्याला दाखल केले.उपचारासाठी ८ हजार रुपयांचा खर्च सांगितला. सुवर्णाने विविध ग्रुप, सोशल साईट आणि स्थानिक मित्र-मैत्रिणींना याबाबत सांगितले. आपल्या एकटीच्या तुटपुंज्या खर्चातून हे पैसे भरणे तिला शक्य नव्हते. अशातच त्यांचा हा पाच जणांचा ग्रुप एकत्र आला. या कुत्रीचे नाव त्यांनी ‘राणी’ म्हणून ठेवले. त्यांनी एकत्र येत ८ हजार रुपये जमवले. सध्या रुग्णालयात दाखल करून १५ दिवस उलटले तरी त्याच्यावर उपचार करण्यास तेथील डॉक्टरांना वेळ मिळत नसल्याने या तरुणींचे हेलपाटे सुरू झाले आहेत. रोज त्यांना आलटून पालटून राणीच्या उपचारासाठी वणवण करावी लागते आहे. डॉक्टर नेहमीप्रमाणे भटका कुत्रा समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सुवर्णाचे म्हणणे आहे. शिवाय दोन वेळा त्याची शस्त्रक्रिया टाळण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी तीन तास उपाशी राहावे लागते. त्यात शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे उपाशीपोटी तिच्या त्रासात भर पडल्याचे सांगत सुवर्णा म्हणाली, तिला गाल, पोट आणि पायावर ट्युमर आहे. गालावरचा ट्युमर केव्हाही फुटू शकतो. तिचे हाल आम्हाला बघवत नाहीत. हेसुद्धा मुके प्राणीच आहेत. त्यांना आपण ओढ लावली, तर ते नात्यातील जवळच्या माणसापेक्षाही आपल्याशी प्रामाणिकपणे वागतात. त्यामुळे किमान डॉक्टरांनी तिच्यावर वेळीच शस्त्रक्रिया करत तिचे प्राण वाचवावेत अशी अपेक्षा तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.