व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसमुळे एका तरुणावर सख्ख्या भावाकडून कैचीने हल्ला करण्यात आला. यात त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून मालाड पोलिसांनी मुकेश पटवा (२६) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महेश पटवा (२८) यांचा डेकोरेशनचे साहित्य विकण्याचा व्यवसाय आहे. मुकेश हा त्यांचा लहान भाऊ आहे. त्यांचे काका अशोक पटवा (४४) यांचा मालाड पश्चिमेला किसन रोड परिसरात गाळा आहे. तिथेच महेश २०१६ पासून व्यवसाय करतात. हा गाळा अशोक यांनी महेश आणि मुकेशला गिफ्ट डिड करार करुन त्यांच्या स्वाधीन केला. पूर्वी मुकेश दुकानात येऊन बसायचा. मात्र, त्याने लग्न केल्यानंतर दुकानात येणे कमी केले. नोव्हेंबरमध्ये महेशने मुकेशला धंद्यामध्ये मदत कर असे सांगितले. त्या बदल्यात त्याला पैसे देत होते.
पैशावरुन वादकाही दिवसांनी मुकेशने भावाकडे अधिक पैसे मागायला सुरुवात केली आणि यावरुन त्यांच्यात वाद झाला. १४ जुलै रोजी महेशने त्याच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅपवर काही स्टेटस ठेवले होते.
तेव्हा मुकेश आणि त्याची पत्नी किरण हे दुकानांमध्ये येऊन सदर स्टेटस हे आपल्यासाठीच ठेवले असल्याचे म्हणत महेशसोबत भांडू लागले. महेशने त्यांची समजूत काढली. मात्र त्यांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली.
यात महेशच्या उजव्या डोळ्यात कैची मारली. त्याला तातडीने शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी मालाड पोलिसांनी मुकेश विरोधात तक्रार दिली नसून भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.