मुंबई : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे वर्ल्ड कप मॅच पाहायला बोरिवलीच्या ऑल सीजन बार अँड रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर झालेल्या राड्यात निशांत सिंग (३५) या इंजिनिअरचे बीअरच्या बाटलीने डोके फोडले. यावेळी त्यांचा भाऊ आणि मित्रही जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी कस्तुरबा पोलिसांत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सिंग हे बांधकाम व्यावसायिक असून, ८ ऑक्टोबर रोजी ते भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये असलेली मंडे वर्ल्डकप क्रिकेट मॅच पाहायला बोरीवली पूर्वच्या देवलापाडा परिसरात असलेल्या ऑल सीजन बार अँड रेस्टॉरंटमध्ये गेले होते. हॉटेलमध्ये पहिल्या माळ्यावर मोठी स्क्रीन असून त्या ठिकाणी सिंग त्यांचा भाऊ अमन आणि अन्य मित्र मिळून १५ जणांचा ग्रुप एन्जॉय करत होता. त्याच हॉटेलमध्ये मॅच बघायला आलेल्या अन्य एका ग्रुपच्या लोकांसोबत सिंगचा मित्र विशाल शर्मा याचा हॉटेलमध्ये गाणी लावण्यावरून वाद झाला. त्यामुळे त्याला त्यांनी घरी पाठवले. त्यानंतर तो आला आणि चौकशी करत त्यांनी राडा घालण्यास सुरुवात केली.
हाणामारी आणि आरडाओरडा- मॅच पाहत असताना रात्री साडेदहाच्या सुमारास सिंग बसलेल्या टेबलाकडे एक जण आला आणि काला शर्टवाला किधर है असे विचारू लागला. - अमन याने काळा शर्ट घातल्याने त्या इसमाने त्याच्या श्रीमुखात भडकवली. ते पाहून सिंग भावाला वाचवायला त्यांच्यामध्ये पडले. तेव्हा दुसऱ्या ग्रुपमधील अविनाश गुरव याने बीअरची बाटली उचलून सिंग यांच्या डोक्यात मारली, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. - त्यांना वाचवायला पुढे आलेला त्यांचा मित्र विकास सिंग (२७) यांच्यावरही बॉटलने हल्ला चढविण्यात आला. हा गट सिंग यांच्या भावाला, तसेच मित्राला मारहाण करू लागला. आरडाओरडा सुरू असल्याने हॉटेलमध्ये जेवायला आलेले लोक त्याठिकाणी जमू लागले.- तेव्हा आरोपींनी सिंग यांना धमकावत घटनास्थळावरून पळ काढला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी बारकडे धाव घेतली आणि जखमींना शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. याविरोधात कस्तुरबा पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.