जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 02:32 PM2018-03-23T14:32:02+5:302018-03-23T14:32:02+5:30
विरोधकांसह शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला मेस्मा कायदा स्थगित केला आहे.
मुंबई- विरोधकांसह शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला मेस्मा कायदा स्थगित केला आहे. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता अंगणवाडी सेविकांनी शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आहे. ते म्हणाले, जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही.
शिवसेना आमदारांनी राज्य सरकारवर आणलेल्या दबावामुळे अंगणवाडी सेविका भगिनींवर लावलेल्या मेस्मा कायद्याला मुख्यमंत्र्यांनी काल स्थगिती दिली होती. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. अंगणवाडी सेविकांचा लढा मोठा आहे. शिवसेना सर्व काही उघड करते, शेतकरी आंदोलनालाही पाठिंबा दिला. ज्याला विरोध करायचा आहे त्याला करतो, तोही उघडपणे करतो. कोणत्याही गोष्टीची प्राथमिकता शोधली पाहिजे. लालबावटा घेऊन जो शेतकरी आला तो रक्ताने लाल झाला, एकीकडे उद्योगपतींना पायघड्या घालायच्या आणि सामान्य माणसाकडे दुर्लक्ष करणे हे मला पटणारे नाही. मग मी सत्तेचा विरोध करत नाही, उघड बोलतो.
शायनिग इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया बोलून चालत नाही. अंगणवाडी सेविका जे करताहेत तो खरा स्टार्ट अप आहे. अंगणवाडी सेविकांना जी सेनेने मदत केलेली आहे ते कोणत्याही श्रेयासाठी केलं नाही. तुम्ही कोणासोबत जायचं हे तुम्ही ठरवा. सरकारच्या असा एक निर्णय दाखवा की मी लोकांसाठी घेतलेल्या निर्णयाला विरोध केला, जे काही आहे लोकांना मिळालं पाहिजे, त्यासाठीच आम्ही लढा देत आहोत. एकजूट असेल तर विजय नक्की होतो. माझी ताकद मी तुमच्यासाठी वापरत आहे, याला बळ द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.