व्यावसायिक शत्रुत्वातून चुलत भावावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:10 AM2018-03-29T02:10:21+5:302018-03-29T02:10:21+5:30
जुन्या व्यावसायिक शत्रुत्वातून गोळीबार केल्याची घटना बुधवारी मालाडमध्ये घडली. या प्रकरणी एकाला कुरार पोलिसांनी अटक
मुंबई : जुन्या व्यावसायिक शत्रुत्वातून गोळीबार केल्याची घटना बुधवारी मालाडमध्ये घडली. या प्रकरणी एकाला कुरार पोलिसांनी अटक केली असून, चौकशी सुरू आहे. राजकुमार जयस्वाल (४२) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा पाण्याचे पंप आणि त्याचे स्पेअर पार्ट विकण्याचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी जयप्रकाश जयस्वाल (५०) हा भायखळ्यात राहणारा असून, ते दोघे चुलत भाऊ आहेत. जयप्रकाशचा व्यवसायदेखील स्पेअर पार्ट विकण्याचा असून, त्यांच्यात याच व्यवसायावरून शत्रुत्व आहे.
बुधवारी राजकुमार हे कुरार गावच्या राज इलेक्ट्रिकल शॉप नंबर ३, संकल्प बिल्डिंग, साहील हॉटेलजवळ पिंपरीपाडाजवळ बसले होते. त्या वेळी जयप्रकाश त्या ठिकाणी आला आणि त्याने सोबत आणलेल्या गावठी कट्ट्याने राजकुमार यांच्यावर गोळी झाडली. मात्र, त्यात ते थोडक्यात बचावले आणि त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाली, अशी माहिती परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली. गोळीबार करून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या जयप्रकाशला स्थानिकांनी पकडले आणि पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानुसार, कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जयप्रकाशला ताब्यात घेतले, तसेच जमावलाही पांगवत स्थिती नियंत्रणात आणली.
जयप्रकाशला पोलिसांनी अटक करत, त्याच्याकडचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे. हे दोघे उत्तर प्रदेशच्या प्रतापगडचे राहणारे आहेत. राजकुमार यांचा भाऊ रत्नेश याची २००४ साली प्रतापगडमध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जयप्रकाशचाही समावेश होता, असे सूत्रांनी सांगितले. सध्या तरी जयप्रकाश एकटाच या हल्ल्यामागे असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याचे कोणी साथीदार आहेत का, याचाही शोध कुरार पोलीस घेत असल्याचे उपायुक्त राठोड यांनी नमूद केले.