मुंबई - मत्स्यव्यवसाय खात्याच्या हलगर्जीपणाचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार दि, ९ रोजी सकाळी १० वाजता न्यू जेट्टी,ससून डॉक,कुलाबा बंदरावर महाराष्ट्र मश्चिमार कृती समितीतर्फे जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत एलईडी लाईटद्वारे पर्ससीन नेट ने मासेमारी बंद होत नाही तोपर्यंत हे हल्लाबोल आंदोलन सुरूच राहील.या वेळी काही अघटित घडल्यास त्यास शासन व मत्यस्यव्यवसाय विभाग जबाबदार असेल असा ठोस इशारा महाराष्ट्र मश्चिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कॉलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी दिला आहे. एलईडी लाईटद्वारे पर्ससीन नेट ने मासेमारी करणाऱ्यांवर केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने गेल्या १० नोव्हेंबर रोजी बंदीचे आदेश दिले असून याची गांभीर्याने नोंद घेऊन ० ते १२ सागरी मैल व त्याच्यापुढे ईईझेड क्षेत्रामध्ये आपण कार्यवाही करून एलईडी लाईट ईईझेड क्षेत्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाची मदत घेऊन कार्यवाही त्वरित करण्याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाकडे मागणी महाराष्ट्र मश्चिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी केली आहे.मात्र असे असताना महाराष्ट्रात वरील पद्धतीची मासेमारी आजही खुलेआम सुरुच आहे. मत्स्यव्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत,उलटपक्षी गेल्या ५ जानेवारी रोजी परिपत्रक काढून मश्चिमार सहकारी संस्थांवर कारवाई करण्याचे कळविले आहे. हि बाब फार संतापजनक आणि दुर्दैवी आहे.अशाच प्रकारे जर पुढे मासेमारी सुरु राहिली तर मोठ्या प्रमाणात मत्स्यसाठे नाहीसे होतील आणि समुद्रात मासळी मिळणार नाही. त्यामुळे मश्चिमारांवर रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होईल व आजच्या घडीस पारंपरिक मश्चिमारांची दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.याबाबत नुकतीच हर्णे आणि दापोली तसेच कुलाबा, कफ परेड येथे झालेल्या जाहीर सभेत मोठा उद्रेक झाला होता अशी माहिती किरण कोळी यांनी शेवटी दिली.
एलईडी लाईट, पर्ससीन नेटने होणारी मासेमारी बंद करण्याच्या मागणीसा मच्छिमारांचे हल्लाबोल आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 8:01 PM